भाजपातील सध्या आक्रमक चेहरा म्हणून आमदार नितेश राणे यांची ओळख बनली आहे. लव्ह जिहादचा विषय असो किंवा वीर सावरकर यांच्या अवमानाचा विषय असो, नितेश राणे कुणाचीही भीडभाड न बाळगता सडेतोड बोलतात आणि विषयाला वाचा फोडतात. त्यामुळे ते कायम माध्यमांमध्ये चर्चेत असतात. नितेश राणे यांच्या याच बेधडक स्वभावामुळे महाराष्ट्रात विरोधकांची पंचाईत होत आहे. असे नितेश राणे प्रसंगानुरूप कसे वागायला हवे याचे भान असल्याचेही दाखवून देत आहेत. याचा प्रत्यय चक्क नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील मुख्यालयात प्रसारमाध्यमांना आला.
म्हणून नितेश राणेंनी माध्यमांशी बोलण्यास टाळले
नितेश राणे यांच्या संयमी स्वभावाचे दर्शन माध्यमांना होण्यामागे कारण ठरले रेशीमबाग. हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या मिळून ११३ आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी नितेश राणे यांनी संघाची परंपरा जोपासली. नितेश राणे म्हणजे बातमी, असे समीकरण बनल्याने रेशीमबागेत नितेश राणे दिसताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली, मात्र माध्यमांना इतर वेळी सहज प्रतिक्रिया देणारे नितेश राणे यांनी मात्र रेशीमबागेत माध्यमांशी बोलण्याचे टाळले. संघाच्या मुख्यालयात माध्यमांशी परस्पर बोलणे योग्य होणार नाही, ही येथील परंपरा नाही, असे सांगत नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नम्रपणे नकार दिला. अशा प्रकारे नेहमी आक्रमक आणि परिणामांची तमा न बाळगता व्यक्त होणारे नितेश राणे यांनी संघाच्या मुख्यालयात मात्र संघाची शिस्त पाळल्याचे प्रसारमाध्यमांना दिसून आले.
(हेही वाचा सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नव्हे हत्या; शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित कर्मचाऱ्याचा खुलासा)
Join Our WhatsApp Community