केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकास कामांच्या श्रृंखलेत पुढील टप्पा गाठत, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तब्बल ५१ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या स्कायवॉक लिफ्ट परियोजनेचे भूमिपूजन केले. याप्रसंगी रेणुका माता संस्थानाचे अध्यक्ष नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी सध्या २४० पायऱ्या चढाव्या लागतात, हा स्कायवॉक तयार झाल्यानंतर पायऱ्या चढण्याची गरज भासणार नाही. या प्रकल्पामुळे रेणुका मातेचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी हे वरदान ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिरात जाण्यासाठी चार कॅप्सूल लिफ्ट तयार केल्या जाणार आहेत, ज्यामुळे भाविकांना टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या स्टेशनवरून थेट मंदिरात जाता येईल आणि मंदिराच्या वरच्या बाजूला असलेल्या मंदिराजवळील स्थानकावर पोहोचता येईल. लिफ्टमध्ये २० लोक, अशा ४ लिफ्टमध्ये एकूण ८० लोक जाऊ शकतील. लिफ्टच्या खालच्या स्थानकात महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, क्लोक रूम, गिफ्ट शॉप आणि दहा दुकाने असतील. वरच्या स्थानकात दृश्य पाहण्यासाठी गॅलरी, प्रतीक्षालय, बाल-महिला स्वतंत्र कक्ष, सुरक्षा कर्मचारी कक्ष, चप्पल व जोडे ठेवण्याची व्यवस्था, वृद्ध व अपंगांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था, स्टेनलेस स्टील रेलिंग आदी सुविधा करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्चात्य कुप्रथा बंद!)
लिफ्टशिवाय या प्रकल्पात ७० मीटर लांब आणि १५ मीटर रुंद स्काय वॉक पूलही बांधण्यात येणार असून, या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रवासी आणि मध्यभागी एकूण २२ दुकाने असतील. लिफ्ट आणि स्काय वॉक पूलाच्या माध्यमातून भाविकांना थेट मंदिर परिसरात जाता येणार आहे. हा प्रकल्प अवघ्या १८ महिन्यांत पूर्ण होणार असून यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पीए यंत्रणा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, २ लाख लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी, सांडपाणी प्रक्रिया आणि सोलर सिस्टीम प्लांट, जनरेटर आदी सुविधा असतील. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून व्यापार वाढणार आहे. प्रदेशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळेल. स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्यासाठी १,७६५ कोटी रुपयांचे आणि १५७.२२ किमी लांबीचे नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community