बिहारमध्ये कुमारांची सत्तापालट ‘निती’, कसा असेल नव्या सरकारचा ‘तेजस्वी’ फॉर्म्युला?

88

महाराष्ट्रात न भूतो न भविष्यति झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. त्यामुळे भाजपने एकीकडे राज्यात आपलं सत्तेतलं स्थान कायम केलं असताना बिहारमध्ये मात्र भाजपला हे स्थान गमवावं लागलं आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे बिहारमध्ये देखील आता सत्तांतरण होणं अटळ असून त्यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे.

कुमार यांचा राजीनामा

नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे आता बिहारमधील भाजप-जेडीयू युतीचं सरकार बरखास्त झालं आहे. मंगळवारी नितीश कुमार यांनी जेडीयूच्या सर्व खासदार आणि आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. त्यावेळी भाजपकडून जेडीयू नेत्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि पक्ष फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुपारी त्यांनी बिहारचे राज्यपाल फगू चौहान यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

(हेही वाचाः आजही 5 रुपयांत कसा मिळतो Parle-G चा पुडा? अशी आहे Genius स्ट्रॅटेजी)

बिहारमध्ये असा आहे सत्तेचा फॉर्म्युला

दरम्यान, बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 243 इतकी आहे. त्यामुळे बहुमतासाठी 122 सदस्यांचा आकडा गाठणं महत्वाचं आहे. सध्या बिहारमध्ये लालू प्रसाद यादव व त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचा आरजेडी हा पक्ष सर्वात मोठा आहे. आरजेडीचे विधानसभेत एकूण 79 आमदार आहेत, त्याखालोखाल भाजपचे 77, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19 व कम्युनिस्ट पक्षाचे 12 आमदार आहेत.

(हेही वाचाः ‘हा आक्षेप लवकरच दूर होईल’, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांचे मोठे विधान)

तसेच हिंदुस्तानी आवाम मोर्चा 4, एमआयएम 1 आणि इतर अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा आरजेडी आणि जेडीयूचं सरकार सत्तेत येण्याची चिन्हे असून, बुधवारीच नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.

नितीश कुमारच मुख्यमंत्री पण…

राजीनाम्यानंतर नितीश कुमारांनी आरजेडीच्या तेजस्वी यादव यांची भेट घेतली असून सत्तास्थापनेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यादव हे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यास तयार असून उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखाते यादव आपल्याकडे ठेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.