सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत आता आयोगाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय ही विनंती मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची विनंती
राज्यातील एकूण 14 महापालिका निवडणुका या प्रलंबित आहेत, तसेच अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही अजून बाकी आहेत. त्यामुळे या निवडणुकांची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यावरुनच आता आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणारे निवेदन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(हेही वाचाः महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार; राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश)
लवकरच सुनावणी होण्याची शक्यता
महापालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात, तर जिल्हा परिषदा आणि ग्राम पंचायतींसारख्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे समजत आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः राज्यातील महापालिका निवडणुका दोन टप्प्यात! मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका कोणत्या टप्प्यात?)
Join Our WhatsApp Community