नितेश राणेंचा ‘फैसला’ उद्यावर! न्यायालयात कुणी कसा केला युक्तीवाद?

संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणे यांच्यावर अटकेची तलवार टांगती आहे. त्यावर मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही, सुनावणी उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार कि नाही, त्यावर बुधवारी निर्णय होणार आहे.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या समोर ही सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. तर, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. तब्बल पाच ते सहा तास न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी न्यायालयाची कामकाजाची वेळ संपल्याने राणेंच्या वकिलाने न्यायालयाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. काही वेळ राणेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेतली.

नितेश राणेंच्या अटकेची गरजच काय?

न्यायालयासमोर 164 खाली फिर्यादीचा जबाब नोंदवला आहे. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे. सीडीआर प्राप्त झाला आहे, मग अजून काय हस्तगत करायचे आहे, असा युक्तिवाद नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला. सगळे सापडलेले असताना आता आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांना काय साध्य करायच आहे?, असा सवालही देसाई यांनी केला. संशयितांना घटना घडल्या नंतर अटक केली. मग ते कुठे राहतात? त्यांचा पत्ता किंवा संशयितांची नावे अद्याप पोलिसांनी अद्याप उघड केली नाहीत. हे पहिल्यांदाचे घडत आहे. संशयितांची नावे एवढे दिवस गुप्त ठेवता मग नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावली हे तपास अधिकाऱ्याला मीडीयाला सांगण्याची गरज काय होती? असा सवालही देसाई यांनी केला.

(हेही वाचा ‘ट्विटर’वर सुसाईड नोट! ओबामासह बॉलिवूड कलाकारांना टॅग केले आणि काय घडले?)

अंतरीम जामीन नाकारला

अटकपूर्व जामी अर्ज झाल्यानंतर पहिला युक्तिवाद अर्जदाराच्या वकिलाने करायचा आहे. त्यांचा युक्तिवाद आम्ही ऐकला. त्यांना काय म्हणायचे आहे ते आम्ही जाणून घेतले. त्यांनी जे जे मुद्दे मांडले त्याला उत्तर देणे आमचे कर्तव्य आहे. आम्ही युक्तिवाद सुरू केला. पण युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही,  असे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच अंतरीम जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.

नितेश राणे मुख्य सूत्रधार 

संतोष परब यांच्यावतीने अॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी बाजू मांडली. कुणाला अडकवायचे असते, तर मी कधीच केस घेतली नसती. त्याच्यावर झालेला हल्ला जीवघेणी होता. ती अपघाताची घटना असती तर गाडी थांबते. पण या ठिकाणी तसे नव्हते. इथे वार केला. तो छातीवर होता. यातील मुख्य सूत्रधार हा नितेश राणेच असल्याचे आम्ही न्यायालयासमोर मांडले, असे अॅड. विकास पाटील शिरगावकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here