मणिपूरचा विषय सात दिवस झालेय संसदेत गाजतोय. तरीसुद्धा पंतप्रधानांनी संसदेत भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे विरोधी पक्षांनी मिळून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. पुढील आठवड्यात या प्रस्तावावर चर्चा होणार असून यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी म्हणाल्या की, आमचा व्हीप पक्षाचा व्हीप आहे. त्यामुळे तो सर्वच खासदारांना लागू असेल. या उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना देखील तो व्हीप लागू होतोच. यामुळे संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या वेळी सर्वच खासदार केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करतील. तसेच उद्धव ठाकरे गटाला सुद्धा आमचा व्हीप बंधनकारक असेल, हे महत्वाचे. शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही कायम आहोत.
मणिपूरच्या विषय वरून लोकसभेत विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. पण या प्रकरणी खरी परीक्षा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी लागणार आहे. कारण, यामुळे आमदारांनंतर या पक्षांच्या खासदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच संसदेत अविश्वास ठराव सादर करण्यात आला आहे. त्यावर चर्चेअंती मतदान होईल. तत्पूर्वी, पक्षातर्फे आपापल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला जातो. त्यामुळे हा प्रसंग दिल्लीच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीमध्ये केवळ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर चर्चा झाली.
या प्रकरणी आतापर्यंत खासदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता. पण आता लोकसभेत काँग्रेसने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केल्यानंतर लवकरच त्यावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदानही होत असते. त्या मतदानावेळी एखाद्या खासदाराने व्हिपचे उल्लंघन केले तर १० व्या शेड्युलनुसार ते अपात्रतेसाठीचे कारण ठरू शकते. सदर खासदाराला आपले सदस्यत्व गमावण्याची वेळ येते. संसदेत शिवसेना व राष्ट्रवादीची परिस्थिती वेगवेगळी आहे. लोकसभेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे १३ खासदार आहेत. ठाकरे गटाकडे ६ खासदारांचे संख्याबळ आहे. एकसंध शिवसेनेत विनायक राऊत गटनेते होते. पण आता शिंदे गटाने राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. शेवाळेंच्या गटनेते पदाला व व्हिप म्हणून भावना गवळी यांच्या नियुक्तीला लोकसभा अध्यक्षांनी मान्यताही दिली आहे.
(हेही वाचा – ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ च्या कारवाईने अस्वस्थ तरुणाची आत्महत्या)
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे लोकसभेत ५ खासदार आहेत. त्यापैकी अजित पवार गटाकडे एकटे सुनील तटकरे आहेत. बाकीचे ४ खासदार शरद पवार गटाकडे आहेत. त्यात गटनेता सुप्रिया सुळेच आहेत. या प्रकरणी गटनेता व व्हिप बदलासंबंधीचा कोणताही दावा लोकसभा अध्यक्षांकडे दाखल झाला नाही. त्यामुळे या स्थितीत कोणता व्हिप अधिकृत असेल याचा निर्णय सर्वस्वी लोकसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या बाबतीत कायदेशीर लढाईचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील संघर्ष संपला आहे. आता अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात पोहोचला आहे. पण राष्ट्रवादीत अद्याप ही लढाई संथ गतीने सुरू आहे. विधानसभा किंवा लोकसभेत अद्याप राष्ट्रवादीच्या गटनेता व व्हिपविषयी अध्यक्षांनी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या बाबतीत लोकसभेत ही वेळ उद्भवू शकते, असे मानले जात आहे. मोदी सरकारच्या विरोधात २०१४ नंतरचा हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. सरकारकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. पण या प्रकरणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांची कसोटी निश्चितच लागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community