घड्याळ… शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह. शरद पवार यांच्या या घडाळ्याचे काटे कधी कोणत्या दिशेला फिरतील याचा अंदाज भल्याभल्यांना लागत नाही. आता देखील राष्ट्रवादीच्या याच घडाळ्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि राज्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा रंगली. त्यानंतर लगेच एकनाथ खडसेंच्या जळगावच्या घरी फडणवीस गेले अन् दुसऱ्याच दिवशी खडसे पवारांना भटले. जरी दोन्ही पक्षातील नेते या भेटी फक्त योगायोग आहे असं सांगत असले, तरी पवारांच्या घड्याळाच्या काट्यांनी दिशा तर बदलली नाही ना? असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
पवार वैतागले?
राज्यात सध्या महाविकास आघाडीत ताळमेळ नाही. या ना त्या कारणाने महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. कधी निर्णय घेतले जातात कधी बदलले जातात, कधी काँग्रेस नाराज होते तर कधी राष्ट्रवादी. मागील दीड वर्ष या सरकारमध्ये हेच सुरू असल्याने, शरद पवारच आता वैतागले नाहीत ना? आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या काट्यांनी देखील दिशा बदलायला सुरुवात केली का, असा अंदाज लावला जात आहे.
(हेही वाचाः ठाकरे सरकारसाठी पुढचे सहा महिने धोक्याचे)
प्रफुल्ल पटेलही अचानक अॅक्टिव्ह
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. नेत्यांच्या अंतर्गत बैठकांनी देखील जोर धरला आहे. सुरुवातीपासूनच भाजपसोबत जायला हवे अशा मताचे असलेल्या प्रफुल्ल पटेल, हे देखील आता राज्यात अॅक्टिव्ह झाले आहेत. नुकतीच त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांसोबत बैठक देखील घेतली. या बैठकीची कमालीची गुप्तता देखील पाळण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या सर्वच नेत्यांची मते जाणून घेत असून, राष्ट्रवादीमध्ये काही तरी वेगळेच शिजत असल्याचे बोलले जात आहे.
अंदाज मात्र लागेना
राष्ट्रवादीमध्ये सुरू काय आहे, याचा थांगपत्ता मात्र कोणालाच लागत नाही. खुद्द शिवसेनेचे नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता राष्ट्रवादीमध्ये जरी काही शिजत असले, तरी ते या कानाचे त्या कानाला कळत नाही. एकीकडे या भेटीगाठींमुळे शिवसेना टेन्शनमध्ये आलेली असताना, काँग्रेस मात्र भलत्याच इराद्यात आहे. काँग्रेसचे मंत्री या ना त्या कारणामुळे महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील बोलले जात आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्री ‘कोण’? उद्धव ठाकरेंनाच पडला प्रश्न)
Join Our WhatsApp Community