खाते वाटपावर आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराज नाही. नाराज असल्याच्या वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत, असे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. तसेच चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आले आहे.
चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल
उद्या अधिवेशन सुरु होणार आहे. चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल. आज संध्याकाळी पाच वाजता सर्व विरोधी पक्षनेत्यांना चहापानासाठी बोलावले आहे. आज मंत्रिमंडळ बैठक होईल. यामध्ये पुरवणी मागण्यांबाबतदेखील चर्चा होईल. 17 ते 25 पर्यंत अधिवेशन पार पडेल. राज्य मंत्रिमंडळ आगामी अधिवेशनाला अभ्यासपूर्ण सामोरे जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा: अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार? सोमय्यांनी ट्वीट करत म्हटले…)
जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जातात
खाते वाटपात शिंदे गटातील मंत्र्यांना कमी महत्त्वाची खाती मिळाली असून, ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावर स्पष्टीकरण देताना, शंभूराज देसाई म्हणाले की, आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराज नाही. नाराज असल्याबाबत जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी आमचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. आम्ही तसा ठरावदेखील केला होता. त्यामुळे कोणीतरी अशा वावड्या उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये.
Join Our WhatsApp Community