महाराष्ट्रात भाजपला अच्छे दिन दाखवणारे नेते कोण?, असा प्रश्न कुणाला जरी विचारला तरी पहिले नाव येईल ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे. गोपीनाथ मुंडे यांचे राज्यात भाजपसाठी मोठे योगदान आहे हे कुणीही विसरू शकत नाही. मात्र याच मुंडे यांच्या कुटुंबाचा आता भाजपला विसर पडला की काय? असा सवाल आता समाज माध्यमांवर विचारला जात आहे. त्याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि खासदार प्रितम मुंडे यांचा मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी प्रितम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, प्रितम मुंडे यांच्या ऐवजी आता राज्यातील दुस-याच नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंडेंच्या लेकीचा मोदी आणि भाजपला विसर पडला का?, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
ख-या ओबीसी चेह-यावर अन्याय
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे, भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झाल्याची टीका त्यांनी केली आहे. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नसल्याचे म्हणत शेंडगे यांनी भाजपवर टीका केली आहे. अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, आज सकाळपासून अचानक भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रीपद हुकल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः हे आहेत मोदी सरकारचे संभाव्य 24 मंत्री! महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?)
पंकजा ताईंचे ट्वीट
प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ मिळेल आणि त्या दिल्लीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांच्या भगिनी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ही माहिती खोडून काढली आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली, ती चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई आणि आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे.
खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2021
केंद्रीय मंत्रीमंळात या नावाची चर्चा
मोदींच्या मंत्रीमंडळात भाजपकडून पाच नावांची चर्चा सुरू असून, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नारायण राणे यांचे नाव असून त्यानंतर भागवत कराड, कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे.
(हेही वाचाः मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी केंद्रात मंत्र्यांच्या राजीनाम्यांना सुरुवात! यांनी दिले राजीनामे)
Join Our WhatsApp Community