मोदी सरकार आल्यापासून खासगीकरणावर भर देत आहे. अनेक सरकारी कपंन्यांचं खासगीकरण करण्याचा घाट मोदी सरकारने घातल्याचं बोललं जातं आहे. त्यातच मोदी सरकार रेल्वेचही खासगीकरण करणार असल्याचं सांगितलं जात होतं, आता या सर्व चर्चांवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पूर्णविराम लावला आहे. राज्यसभेत बोलताना, अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेच्या खासगीकरणाचा मोदी सरकारचा कोणताही विचार नाही. सोबतच बुलेट ट्रेनसारख्या जगातील अत्याधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ देशातील रेल्वे प्रवाशांना द्यायला हवा की नाही? असा सवालही त्यांनी विरोधकांना केला.
हे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही
केंद्रीय अर्थसंकल्पातील रेल्वेविषयक चर्चेला उत्तर देताना रेल्वेमंत्री वैष्णव व विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हे सरकार यापूर्वीच्या सरकारांच्या काळातील चांगल्या कामांचा उल्लेखही करत नाही, श्रेय देणे तर दूरच असे सांगताना खर्गे यांनी, अशी भूमिका कायम ठेवणे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही असे सांगितले. भारतीय रेल्वेच्या विकासासाठी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह साऱ्याच माजी रेल्वेमंत्र्यांनी प्रयत्न केले. मात्र खर्गे यांच्या पक्षाच्या काळातच ‘टू-जी स्पेक्ट्रम’ सारख्या प्रकल्पांचीच जास्त चर्चा होत असे, असे टीकास्त्र वैष्णव यांनी सोडले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
( हेही वाचा :यंदा उन्हाळी सुट्ट्या लांबणीवर, रविवारीही भरणार शाळा ? )