संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी; पुढील सुनावणी 24 जानेवारीला

187

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आली आहे. शिवडी न्यायालयाने हे वाॅरंट काढले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने ही सुनावणी घेतली. येत्या 24 जानेवारीला या प्रकरणी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिका-यांच्या न्यायालयासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे. संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.

( हेही वाचा: संजय राऊत नाशिकात पोहोचण्याआधीच ५० शिवसैनिकांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’! )

राऊतांची ‘जामीन रद्द’ ची याचिका पुढे ढकलली

दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा ईडीमार्फतही तपास सुरु आहे. याच प्रकरणी 102 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत सध्या जामीनावर आहेत. त्यांचा हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीमार्फत आतापर्यंत चार वेळा खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. मात्र, जामीन रद्द झालेला नाही. शुक्रवारी न्यायाधीश नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर ईडीने याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायाधीश बोरकर हे उपस्थित नसल्यामुळे याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.