भारतीय जनता पक्ष ज्या राज्यांत त्यांची सत्ता नाही, त्या राज्यात राज्यपालांच्या माध्यमातून समांतर सत्ता चालवत आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल येथे तसा अनुभव येत आहे. महाराष्ट्रातही राज्यपाल दुडूदुडू धावत आहेत. धावू द्या, धावत धावत दमतील आणि पडतील, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांचा गुरुवारपासून सुरु झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला होता, तरीही राज्यपाल दौऱ्यावर निघाले. त्यावर राऊत यांनी टीका केली.
केंद्र सरकारने लोकशाही मोडीत काढली!
पेगॅसस प्रकरणी संसदेत केवळ चर्चा व्हावी, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे. हे हेरगिरीचे कांड काय आहे, हे देशाला समजून घ्यायचे आहे. इतकीच विरोधकांची अपेक्षा आहे. पण हे सरकार ना शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करत, ना पेगॅसस याविषयावर चर्चा करत. त्यामुळे त्यांनी एकदाचे सांगून टाकावे कि, त्यांनी संसदीय रचना, लोकशाही मोडीत काढली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असेल तर ते शक्य नाही. सरकार बोलू देत नाही म्हणून विरोधकांनी पेगॅसस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्र सरकार सर्व मुद्यावर चर्चा करायला तयार आहेत, पण ते सांगतील त्याच मुद्यावर. या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अनेक लढे देण्यात आले आहेत. जे यावर हल्ले करतात ते संपून गेले आहेत, असा इशारा राऊत यांनी दिला.
(हेही वाचा : तरीही राज्यपाल निघाले मराठवाड्याच्या दौऱ्यावर!)
राज्यपालांच्या सरळ भूमिकेमुळे काहींना मळमळ! – राज्यपाल
संविधानानुसार सगळे अधिकार राज्यपालांना आहेत. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला सल्ला देण्यासाठी त्याठिकाणी त्यांना संविधानाने बसवले आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करु नका असे कोणी सांगू शकत नाही. पीसी अलेक्झांडर किंवा राज्यपाल जमीर यांनी तर महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला आहे. मग त्यावेळी हे विषय का आले नाहीत? हे राज्यपाल प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. त्यामुळे काही लोकांना मळमळ होत आहे. ती मळमळ याप्रकारे बाहेर निघत आहे, त्या लोकांना माझा सल्ला आहे. त्यांनी भारतीय संविधानाचे वाचन करावे आणि त्यानंतर अशी वक्तव्य करावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community