North East LS Constituency : मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत कोटेचा यांना यंदा करावे लागतात शर्थीचे प्रयत्न

183
North East LS Constituency : मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत कोटेचा यांना यंदा करावे लागतात शर्थीचे प्रयत्न

उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजपाने विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कापून मुलुंडमधील आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठा पक्षाने माजी खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदार संघात भाजपाचे तीन आमदार आहेत तर तीन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. मात्र, मनसेची मते ही शिवसेनेची यापूर्वी मिळणाऱ्या मतांची पोकळी निर्माण करणारी असली तरी पाटलांना बाहेरचा रस्ता दाखवण्याइतपत कोटेचा यांना पुरक वातावरणही नाही. त्यामुळे सन २०१४ आणि २०१९मध्ये भाजपाला सहज विजय मिळवता आला असला तरी २०२४ मध्ये कोटेचांना विजय मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. (North East LS Constituency)

मिहिर कोटेचांना घाटकोपर पूर्व आणि पश्चिम यासह मुलुंडमध्ये अधिक मते घेतल्यास आणि विक्रोळी, भांडुपमध्ये मनसेची अधिक मते मिळाल्यास मतांचा पल्ला जिंकण्यापुरती गाठावा लागेल, परंतु दुसरीकडे पाटील यांनी मानखुर्दसह विक्रोळी आणि भांडुपमधून अधिक मतांची पोतडी बांधल्यास कोटेचा यांच्यासाठी लढत अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मराठी विरुध्द अमराठी असा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनांवर हल्ला करणे तसेच दगडफेक करणे याबाबतचे प्रकार घडले आहेत. मात्र, कोटेचा यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये रॅली काढल्यामुळे ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची बनवली आहे. ज्या अर्थी मोदी यांनी या मतदार संघात रॅली काढल्यामुळे मुंबईतील भाजपाला सहज विजय मिळता येणाऱ्या पहिल्या दोन क्रमांकावर ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदार संघ आहे. त्यामुळे भाजपाकडून कोणत्याही प्रकारची रिस्क उचलली जात नाही. (North East LS Constituency)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूर येथून अटक)

या मतदार संघात १६ लाख ३६ हजार मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ७७ हजार तर ७ लाख ५८ हजार ७९९ एवढी आहे. या मतदार संघात मराठी आणि गुजराती, राजस्थानी यांची मतदार संख्या अनुक्रमे सरासरी साडेतीन ते पावणे चार लाखांच्या आसपास आहे, तर उत्तर भारतीयांचे प्रमाणे पावणे तीन लाख, दक्षिण भारतीयांचे प्रमाण सव्वा लाख तसेच मुस्लिमांचे प्रमाण अडीच ते पावणे तीन लाख एवढे आहे. (North East LS Constituency)

या लोकसभा मतदार संघामध्ये मनसेचे प्राबल्य असून मुलुंड विधानसभा मतदार संघात सरासरी १५ हजार, विक्रोळीमध्ये सरासरी १५ हजार, भांडुप पश्चिम भागात सरासरी ३५ ते ४० हजार, घाटकोपर पश्चिम भागात सरासरी १५ हजार, घाटकोपर पूर्व भागांत सरासरी १५ हजार तसेच मानखुर्द शिवाजी नगर भागात सरासरी ५ हजार अशाप्रकारे सुमारे एक लाख ते एक लाख दहा हजारांच्या घरांमध्ये मनसेचे पक्के मतदार आहेत. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत मनसैनिक गोंधळलेल्या अवस्थेत होता, त्या तुलनेत यंदा पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल्याने मनसैनिक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लोकसभेत कामाला लागलेले पहायला मिळत आहे. याचा फायदा महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही मते निर्णायक ठरणार आहेत. (North East LS Constituency)

(हेही वाचा – घाटकोपरनंतर Pimpri-Chinchwad शहरात होर्डिंग कोसळले; मात्र मोठी दुर्घटना टळली)

या मतदार संघात सन २००४मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे २००९मध्ये संजय दिना पाटील, तर सन २०१४मध्ये भाजपाचे डॉ. किरीट सोमय्या आणि सन २०१९मध्ये भाजपाचे मनोज कोटक हे विजयी झाले होते. या मतदार संघातून काँग्रेसचे गुरुदास कामत हे १९९४ पासून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते, तर सोमय्या हे दोन वेळा खासदार बनले होते. परंतु सलग दुसऱ्यांदा कुणालाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळेच भाजपाने कोटक यांना बदलून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली असावी असे बोलले जात आहे. (North East LS Constituency)

विशेष म्हणजे सध्या निवडणूक रिंगणात शिवसेनेकडून उतरलेले संजय पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. या दोन्ही वेळा संजय पाटील हे पराभूत झाले होते. सन २०१४मध्ये पाटील यांना २ लाख ०८ हजार एवढे मतदान झाले होते, पण त्यानंतरच सन २०१९च्या निवडणुकीत पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ मते मिळाली. म्हणजे तब्बल पाच वर्षांत त्यांच्या मतांमध्ये ८० हजारांनी वाढ झाली होती. त्यामुळे यावेळी शिवसेनेकडून निवडणुकीत उतरत असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हक्काची मते आणि शिवसेनेची मते अशाप्रकारे मतांची मोठी पोतडी त्यांच्याकडे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (North East LS Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha : राहुल गांधी आणि प्रियंका पळपुटे भावंडं : दिनेश शर्मा)

या भागातील प्रमुख समस्या

या मतदार संघातील मिठागराच्या जागा, मेट्रो रेल्वेची कामे, वाहतूक कोंडी, झोपडपट्टींचा रखडलेला विकास, म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, रमाबाई नगरचा पुनर्विकास, डोंगरावरील वस्त्यांचे पुनर्विकास, दरडींच्या दुघर्टना आदी प्रमुख समस्या आहेत. (North East LS Constituency)

सन २००४ : गुरुदास कामत, काँग्रेस – ४, ९३,४२०

सन २००९ : संजय दिना पाटील – २, १३, ५०५

सन २०१४ : डॉ. किरीट सोमय्या – ५, २५,२८५

सन २०१९ : मनोज कोटक – ५, १४, ५९९ (North East LS Constituency)

विधानसभा क्षेत्रातील आमदार

मुलुंड : मिहिर कोटेचा, भाजपा

विक्रोळी : सुनील राऊत, शिवसेना उबाठा

भांडुप पश्चिम : रमेश कोरगावकर, शिवसेना उबाठा

घाटकोपर पश्चिम : राम कदम, भाजपा

घाटकोपर पूर्व : पराग शाह, भाजपा

मानखुर्द शिवाजीनगर : अबू आझमी, समाजवादी पक्ष (North East LS Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.