राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. शिवसेनेकडूनही ही मागणी सातत्याने होत असते. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने तर पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठरावही केला. परंतु, या विषयावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
मला यूपीएच्या अध्यक्षपदात अजिबात रस नाही. मी त्यात पडणार नाही. ती जबाबदारी मी घेणार नाही. असे शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने तुमच्या नावाचा आग्रह यूपीएच्या अध्यक्षपदासाठी धरत आहेत, असे पत्रकारांनी म्हटल्यावर पवार म्हणाले की ते राऊत यांचे मत आहे. माझे तसे मत नाही. जनाधार असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन पर्याय द्यायला हवा. तसे झाल्यास काहीतरी सकारात्मक घडेल. पवारांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता राऊत एकटे पडल्याचे दिसत आहे.
ममता बॅनर्जी शक्तीशाली
ममता बॅनर्जी यांचा पक्ष बंगालमध्ये शक्तीशाली आहे. त्या सत्तेत आहेत. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. बाकीच्या पक्षांची राज्या राज्यात शक्तिकेंद्र आहेत. काँग्रेस सत्तेत नसेल पण देशात सर्व ठिकाणी काँग्रेस कमी जास्त प्रमाणात आहे. प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आहे. गावात आहे. जो पक्ष व्यापक आहे. त्या पक्षाला घेऊन पर्यायी काही करायचं असेल तर ते वास्तवाला धरून होईल. आमचे मित्रं पक्ष काही करत असेल तर त्यातून चांगलं निर्माण होईल, असे शरद पवार म्हणाले.
( हेही वाचा: त्यांचे हेच वैशिष्ट्य आहे; पवारांनी केले राज यांना लक्ष्य )
तर ते पुतिन सारखं होईल
देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असावा, संसदीय लोकशाहीत असायला हवा. एकच विरोधी पक्ष हवा असेल तर मग ते पुतीन सारखं होईल. रशियाने ठराव केला. चीनने केला. असे पुतीन होऊ नये ही अपेक्षा आहे, अशी खोचक टीकाही पवारांनी यावेळी केली.