वेदांता-फॉक्सकॉनने आपल्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड केली. १.६६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यात सध्या आरोपांचा महापूर यावा, तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर त्याचे खापर फोडण्यात व्यस्त आहेत. पण एखादा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची ही पहिली वेळ नव्हे, गेल्या १० वर्षांत तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – गनिमी काव्यानं शिवतीर्थावरच होणार दसरा मेळावा, शिवसेनेचं ओपन चॅलेंज)
वाहन उद्योग क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेली किया मोटर्स हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण. ही कंपनी औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीत गुंतवणुकीसाठी इच्छुक होती. यासाठी कोरियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक पाहणी दौरेही केले. परंतु, आंध्रप्रदेश सरकारकडून चांगली ऑफर मिळाल्याने त्यांनी प्रकल्प तिकडे नेला. कियाने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे सध्या १२ हजार ८०० कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यातून स्थानिकांना १० हजारांहून अधिक रोजगारसंधी निर्माण झाल्या आहेत.
टेस्लाचे घोडे कुठे अडले?
विजेवरील वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या अमेरिकी कंपनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये भारतात गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी त्यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले. पण जानेवारी २०२१ मध्ये टेस्ला बंगळुरात गेली. तेथे ती १ लाख काेटींपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘ओला’ गेली तामिळनाडूत
खासगी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ‘ओला’ या कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्यासाठी पाहणी केली होती. पण, तामिळनाडूने चांगल्या सवलती दिल्याने त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. तैवानची विस्ट्रॉन कंपनी महाराष्ट्रात येणार होती. पण, तिला कर्नाटकने भुरळ घातली. पाठोपाठ पेगाट्रॉनही तिकडेच गेली. डेलारू या ब्रिटिश कंपनीने औरंगाबादमध्ये पाहणी केली. पण घोडे पुढे सरकले नाही. शिवाय ग्रेट वॉल मोटर्स, होंडा, डीएसके मोटोव्हील्स, जनरल डायनॅमिक्स मिळून तब्बल दहा लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीला महाराष्ट्र मुकला आहे.
कारणे काय?
– एखादी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी त्यांना विविध सुविधा, सवलती द्याव्या लागतात. या कंपन्यांना धोरण लवचिकता, तत्काळ निर्णय अपेक्षित असतो. शिवाय पर्यावरण, इमारत बांधणी, एनए यासारख्या परवानग्या तत्काळ मिळायला हव्यात.
– वेदांता-फॉक्सकॉन कंपनी आधीच्या सरकारच्या काळापासून चर्चा करत होती. कोणताही उद्योग फायद्यासाठी गुंतवणूक करतो. त्यांना गुजरातमध्ये फायदा दिसला. महाराष्ट्राकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.