स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, नेहरुच होते खरे माफीवीर! भातखळकरांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अनेकदा अपमानास्पद विधाने करण्यात येतात. पुन्हा एकदा काँग्रेसच्या इंस्टाग्राम पेजवरुन सावरकरांचा अपमान करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील राहुल गांधींवर घणाघात केला असून, सावरकर नव्हे तर नेहरुच खरे माफीवीर होते, अशी झणझणीत टीका भातखळकर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

राहुल गांधींचा वाचन आणि विचारांशी संबंध नाही

उल्लुमशाल राहुल गांधी आणि काँग्रेसच्या बगलबच्च्यांना थोडे इतिहासाचे ज्ञान देण्याची गरज आहे, असे एका व्हिडिओत भातखळकरांनी म्हटले आहे. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या हालअपेष्टांचे वर्णन त्यांनी आपल्या काळे पाणी या पुस्तकात केले आहे. विक्रम संपत यांनी आठ वर्षे अभ्यास करुन सावरकरांवर दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. पण वाचन आणि विचार यांच्याशी राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा काही एक संबंध नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणा-या काँग्रेसवर भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. खरे माफीवीर हे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत. सावरकरांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ अंदमानच्या कोठडीत घालवला आहे. त्या कोठडीत गेल्यानंतर आजही आपल्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येतं. इतक्या भयानक यातना त्यावेळी सावरकरांना भोगाव्या लागत होत्या.

का आहेत नेहरू खरे माफीवीर?

पण नेहरुंनी काय केले तर 1923 साली पंजाबमधील गाभा संस्थानाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते गेले. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करुन तुरुंगात डांबले. तेव्हा तिथला तुरुंग पाहून नेहरु म्हणाले होते की, हा काय तुरुंग आहे? इथल्या भिंती पडक्या आहेत, मातीच्या आहेत. इथे डास आहेत, ढेकूण आहेत. हे मला सहन होत नाही. मी यापूर्वी ज्या तुरुंगात होतो, तिथे मला हवं ते खायला मिळायचं, खेळायला मिळायचं. इथे काहीच नाही. मग त्यांचे पिताश्री मोतीलाल नेहरू कळवळून उठले. त्यांनी थेट तत्कालिन व्हाइसरॉय यांच्याकडे याचना केली. माझा मुलगा उच्च विद्याविभूषित आहे. तुम्ही सांगाल त्या अटी आम्हाला मान्य आहेत, पण जवाहरला सोडा. मग व्हाइसरॉयने मध्यस्थी केली. जवाहरलाल यांनी माफीची याचना केली, बॉण्ड लिहून दिला. मग दोन आठवड्याच्या आत या तथाकथित तुरुंगातून काढले गेले आणि मग ते आपल्या घरी खुशाल गेले. नेहरूंच्या सोबत आणखी दोन सहकारी होते. त्यांचे काय झाले. जे नरसिंहरावांच्या बाबत झाले तेच या सहकाऱ्यांचे झाले. ते राहिले तुरुंगात आणि नेहरू आपल्या घरी, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here