उद्धव ठाकरे नव्हे तर संजय राऊत हेच खरे ‘शिउबाठा’चे अध्यक्ष

104

महाराष्ट्राच्या राजकारणात जी संथ गती आली होती, आता ती दूर झाली आहे. महाराष्ट्रात बरेच दिवस विशेष काही घडत नव्हतं. ठाकरेंचा दसरा मेळाव्याची त्यातल्या त्यात चर्चा झाली, परंतु पाहिजे तशी धार प्राप्त झाली नव्हती. ऋतुजा लटके यांचा विजय देखील मिळमिळीत होता. या पोटनिवडणूकीत मजा आली नाही. सुषमा अंधारे अधूनमधून बोलतात, परंतु त्यांना अर्ध-हिंदुत्वाच्या वातावरणात ऍडजस्ट व्हायला कठीण जातंय.

आणि अचानक एक महत्वाची घटना घडली. महाराष्ट्राचे लाडके नेते संजय राऊत यांना जामीन मिळाला. त्यानंतर रात्री त्यांनी मीडियासमोर दणक्यात भाषण केलं. तेव्हा त्यांनी केलेली विधाने अत्यंत महत्वाची आहेत. ते म्हणाले की चिन्ह गोठवणार्‍यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचं वैभव परत आणू. देशातल्या राजकारणाची सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतला अटक करणे. महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार. मी १०३ दिवस तुरुंगात होतो, आता १०३ आमदार निवडून आणणार.

संजय राऊत यांची ही वाक्य अतिशय महत्वाची आहे. काल संजय राऊत सुटल्यानंतर शिउबाठाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. मला हा जल्लोष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यापेक्षाही मोठा वाटला. ज्यावेळी ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले तेव्हाही शिउबाठा कार्यकर्ते इतके भावूक झाले नव्हते, जितके संजय राऊत सुटल्यामुळे झाले. त्यामुळे असं चित्र उभं राहत आहे की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंपेक्षा खूप लोकप्रिय आहेत आणि मोठे नेते आहेत.

संजय राऊत यांनी भाषणात जरी बाळासाहेबांचे आभार मानले असले तरी त्यांच्या बोलण्यात एकप्रकारचा ‘मी’पणा होता. १०३ आमदार ते निवडून आणणार आहेत, असा आत्मविश्वास आहे त्यांचा. दुसरी गोष्ट त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं होतं असा त्यांचा समज आहे. म्हणूनच ते गेली अडीच वर्षे चाणक्य बनून फिरत होते. त्यामुळे आता पुन्हा ते शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजेच ठाकरे कुटुंबातला एक मुख्यमंत्री करणार आहेत.

त्यांच्या भाषणातील आणखी एक महत्वाची गोष्ट ज्याकडे कोणाचं विशेष लक्ष गेलं नाही. राऊत म्हणाले त्यांना तुरुंगात पाठवणे ही देशातल्या राजकारणातील मोठी चूक आहे. म्हणजे याआधी लालू प्रसाद यादव, चिदंबरम इत्यादी बडे नेते तुरुंगात गेले होते. पण ही खूपच छोटी गोष्ट झाली. नवाब मलिक, अनिल देशमुख, छगन भुजबळांनाही तुरुंगात जावं लागलं पण त्यांच्या दृष्टीकोनातून ही घटना अतिशय सामान्य आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, ४० आमदार घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन केला, ठाकरेंना अपमानित होऊन मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. पण संजय राऊतांच्या मते ही घटना अतिशय म्हणजे अतिशय सामान्य व लहान आहे.

मोठी घटना कोणती? तर संजय राऊत यांना तुरुंगात पाठवणे ही मोठी घटना आहे. ठाकरेंपेक्षा तर संजय राऊत यांचीच जास्त चलती आहे. आता भारत जोडो यात्रेतही राऊत सहभागी होण्याची शक्यता आहे. तेव्हा ते राहुल गांधींना देखील मागे टाकतील आणि सर्वांचं लक्ष स्वतःकडे वळवतील. त्यामुळे संजय राऊत हेच खर्‍या अर्थाने शिउबाठाचे अध्यक्ष आहेत. मागे एकदा शिवसेना भवनाबाहेर ‘संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है.’ अशा घोषणा देण्यात आल्या. बाकी सब या शब्दांचा अर्थ ठाकरेंना कळला नव्हता आणि कदाचित यापुढेही कळणार नाही. तुम्हाला कळला का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.