सुशांत सावंत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पवारांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी त्यांच्याकडे या नोटिशीद्वारे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी आपल्यावर प्रेम असल्यामुळे आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, अशा खोचक शब्दांत त्यांनी मतप्रदर्शन केले.
सुप्रिया सुळे यांनाही नोटीस
आयकर विभागाने आधी मला नोटीस पाठवली आहे, आता सुप्रिया सुळे यांनाही नोटीस येणार आहे, असे कळते. चांगली गोष्ट आहे. सुप्रिया सुळे यांना काल संध्याकाळी नोटीस येणार होती. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून, काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर लवकरच आपण देणार आहे, कारण उत्तर दिले नाही तर दिवसाला १० हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार म्हणाले.
याआधी ईडीला केलेले धोबीपछाड
याआधी ईडीकडून शरद पवार यांना नोटीस पाठवली जाणार, त्यांची चौकशी होणार अशी चर्चा घडवण्यात आली होती, प्रत्यक्षात नोटीस आलीच नाही, म्हणून पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात हजार होण्यासाठी निघाले होते, मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून नये यासाठी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. सध्या त्यांच्या चौकशीची गरज नसून कार्यालयात येण्याची काही गरज नसल्याचे ईडीकडून कळवण्यात आले होते. तसेच भविष्यात गरज लागेल तेव्हा आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यांनतर तुम्ही येऊ शकता असा मेल ईडीनं शरद पवारांना पाठवला होता.