शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात उल्लेख असून, ५ डिसेंबरला त्यांना अलिबाग कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा : दिव्यांग मंत्रालयासाठी १ हजार १४३ कोटींची तरतूद; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
राजन साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. नुकतेच त्यांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या पार्टीला हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, साळवी यांनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर त्यांना एसीबीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एसीबीने साळवी यांना पाठवलेल्या नोटीशीत ५ डिसेंबरला अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे साळवी या चौकशीला हजर राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
वैभव नाईक यांची चौकशी सुरू
याआधी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनाही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने नोटीस पाठवली होती. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चाही काढला होता. आता साळवी यांनाही एसीबीची नोटीस आल्याने यासंदर्भात उद्धव गट काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community