खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहेत. या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती यांना 6 एप्रिल रोजी दिल्लीत लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील या ४ अधिकाऱ्यांना नोटीस
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव या सारख्या राज्यातील चार अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अमरावती जिल्ह्यात 2020 मध्ये प्रचंड पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावे यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कोरोनाचा काळ असल्याने राणा दाम्पत्याला घरातच स्थानबद्ध करण्यात आले होते.
(हेही वाचा – १ एप्रिलपासून सामान्यांपासून श्रीमंतांना बसणार फटका! काय महाग आणि काय होणार स्वस्त?)
अशी केली राणांनी संसदेत तक्रार
अर्ध्या रात्री पोलीस माझ्या घरी आले आणि तुम्हाला फरफटत नेऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर आम्हाला पोलीस घेऊन गेले आणि पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. एका लोकप्रतिनिधीचा अपमान केला, अशी तक्रार राणांनी संसदेत केली होती.