ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन राज्यातील सत्तेत सहभागी असलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही. मग ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस छगन भुजबळ दाखवतील का?, असा थेट सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
भुजबळांचे ओबीसी आरक्षणावर मौन का?
आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. सध्या यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, छगन भुजबळ राज्याचे प्रमुख नेते असून सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार मंत्री सुद्धा आहेत. कॅबिनेटमध्ये अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता होती, पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न आहे. जर आपल्या समाजाविषयी एवढी कदर असेल व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकराने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस मंत्री छगन भुजबळ दाखवतील का?, असा खोचक सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा : भाजपचा शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा! सेना भवनसमोर राडा)
मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी ‘ते’ व्यासपीठ नव्हते!
कोल्ह्यापूर येथे झालेल्या मूक आंदोलनावरून दरेकर म्हणाले कि, छत्रपती सांभाजीराजे यांचा सर्व पक्षांनी, नेत्यांनी सन्मान केला. सर्व नेत्यांनी आपापल्या भूमिका आंदोलनस्थळी मांडल्या. आंदोलनात भूमिका मांडून मार्ग निघाला का? प्रत्यक्षात मार्ग काढण्यासाठी ते व्यासपीठ नव्हते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आंदोलनस्थळी आले असते, तर मराठा संदर्भात निर्णय घेऊ शकले असते. परंतु आंदोलनाची सुरुवात म्हणून या विषयी संवाद झाला, यातून काय निष्पन्न होत आहे, मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देणार आहे, मग चर्चेसाठी वेळ देण्यासाठी हे केवळ आंदोलन होतं का ? किंबहुना या ठिकाणी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे, हे सांगण्यासाठी आंदोलन होते का ? या सर्व गोष्टी सर्व लोकांना माहित आहे, असेही दरेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community