काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही हवी शिथिलता! निर्बंधांमुळे जनतेत असंतोष!

कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून, लोकांच्या रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता निर्बंध शिथिल करावे, असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे देखील मत आहे.

107

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ठाकरे सरकारने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता जे निर्बंध लागू आहे, त्यामध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता करू लागली असताना आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील शिथिलता हवी आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांना असे किती दिवस वेठीस धरायचे, असा मतप्रवाह ठाकरे सरकारमध्ये तयार झाला असून, आता निर्बंध अधिक शिथिल करावेत, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

खुद्द पवारांचा निर्बंधांना विरोध!

कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून, लोकांच्या रोजगाराचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता निर्बंध शिथिल करावे, असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे देखील मत आहे. मात्र जोवर राज्यावरचे संकट कमी होत नाही, तोवर निर्बंधामध्ये सुट देण्यास मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्याने शरद पवार देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांचा लॉकडाऊनला सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यातच महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तेत असूनही फक्त मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी निर्बंध शिथिल होत नसल्याने पवार नाराज असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : शाळा सुरु करण्यावर मंत्र्यांमध्ये मतभेद! शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर आरोग्यमंत्र्यांचा आक्षेप!)

लोकलवरूनही मतभेद

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली लोकल सध्या सर्वसामान्य नागरिकांना बंद ठेवण्यात आली असून, लोकल आता टप्प्याटप्याने सर्वसामान्यांसाठी सुरु करावी असे मत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आज लोकल बंद असल्याने सर्वसामान्य जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने तसेच लोकांचे होणारे हाल लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता लोकलबाबत देखील विचार करायला हवा, असे मत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनी खासगीत बोलताना मांडले.

मुख्यमंत्र्यांना वाटतेय तिसऱ्या लाटेची भिती

एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुकूल नसल्याची माहिती मिळत आहे. राज्यात येत्या काही दिवसांत तिसऱ्या लाटेची शक्यता असून, राज्यावरचे संकट अजून गेलेले नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्री स्वत: टास्क फोर्स तसेच इतर तज्ज्ञांशी बोलत असून, जोवर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होणार नाही तोवर राज्यात कोणतीही रिक्स घ्यायला मुख्यमंत्री तयार नसल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे.

राज्यात आठवड्याभरातील कोरोनाची स्थिती

तारीख      रुग्ण         मृत्यू              दिवसभरात बरे झालेले रुग्ण

  • ५ जुलै       ६,७४०         ५१              १३,०२७
  • ६ जुलै       ८,४१८        १७१              १०,५४८
  • ७ जुलै       ९,५५८        १४७              ८,८९९
  • ८ जुलै       ९,११४        १२१              ८,८१५
  • ९ जुलै       ८,९५२        २००              १०,४५८
  • १० जुलै      ८,२९६        १७९              ६,०२६
  • ११ जुलै      ८,५३५        १५६              ६,०१३

(हेही वाचा : आता गांधीगिरी नाही, तर आक्रमकता दाखवणार! नियम शिथिलतेसाठी व्यापारी संतप्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.