राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय स्फोट होत असताना आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे खुद्द एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सिल्व्हर ओकवर जाऊन देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करणार आहेत.
दरम्यान, ही राजकीय भेट नसून शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात महत्वाचे याआधी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली होती. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
पवारांच्या तब्येतीची चौकशी की जवळीक वाढवण्याचा प्रयत्न?
कालपर्यंत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना शरद पवार यांची काळजी वाटू लागल्याने आचर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या या भेटी भाजप-राष्ट्रवादीमधील जवळीक वाढविणार्या तर नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याआधी भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी देखील पवारांची भेट घेतली होती.
(हेही वाचा : धक्कादायक! मुसलमानांमध्ये कोरोना लसीबाबत सर्वाधिक गैरसमज! आरोयमंत्र्यांची पुष्टी )
अहमदाबादमधील भेटीची चर्चाही गाजली!
दरम्यान अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता प्रफुल्ल पटेल व भाजपच्या बड्या उद्योगपतींची भेट झाली. या भेटीवेळी शरद पवार देखील उपस्थित होते. तसेच, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्राने दिले आहे. या भेटीसाठी पवारांनी प्रायव्हेट जेट वापरल्याचा दावाही वृत्तात केला होता. मात्र शरद पवार व अमित शहा यांच्यात भेट झाली नाही. प्रफुल्ल पटेल व शरद पवार अहमदाबादहून थेट मुंबईला आले आहेत. त्यांच्यात भेटच झाली नाही,’ असे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच ‘गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे,’ असेही म्हटले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असे सांगून प्रश्न उडवून लावला होता.
Join Our WhatsApp Community