महापालिकेच्या शाळांमधून वन्यजीव आणि जैवविविधतेची आता माहिती : शिक्षण विभागासाठी यंदा ३,३७० कोटींची तरतूद

191

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्प महापालिका सहआयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना सादर केला. शिक्षण विभागासाठी मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ४०० कोटींची वाढ करत ३३७०.२४ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. यामध्ये वन्यजीव आणि जैवविविधतेच्या माहितीकरताचा उपक्रम आता महापालिकेच्या शाळांमधून राबववला जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आधीच यासाठी पाऊल उचललेले असतानाच आता अशाप्रकारचा उपक्रम महापालिकेच्या शाळांमध्ये राबवून विद्यार्थ्यांना जैव विविधतेची माहिती दिली जाणार आहे.

महापालिका शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये शाळांमधील भिंतीही आता बोलक्या करण्याच्यादृष्टीकोनातून नैसर्गिक चित्रांनी रंगवण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच महापालिकेच्या शाळांमध्ये १० हजार पॉलीमर डेस्कची खरेदी केली जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी, टॅबचा पुरवठा, शाळांची दैनंदिन स्वच्छता आदींवरच मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यावर भर देण्यात आला आहे.

(हेही वाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन नाही तर प्रत्यक्ष सभेत: निर्णय बदलण्याची आयुक्तांवर नामुष्की)

१८ मैदानांच्या विकासाचे काम सुरू होणार

मुंबईच्या महापालिका शाळांच्या मालकीचे एकूण ६३ मैदाने आहेत. त्यातील ६३ मैदाने सुस्थितीत आहेत. शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत उर्वरीत २० मैदानांपैकी चालू वर्षात ०२ मैदानांच्या विकासाचे काम सुरु असून १८ मैदानांच्या विकासाचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहे.

ई वाचनालये सुरु करणार

महापालिकेच्या २५ माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधांसह ४ संगणक संच ई वाचनालयाकरता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षकांच्या त्यांच्या लॉगिन, पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांच्या मार्फत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच क्लिकवर माध्यम व विषय निहाय अभ्यासक्रमांची ८०० संदर्भ मराठी, हिंदी व ऊर्दु व इंग्रजी या माध्यमांची पुस्तके वाचता येतात. आगामी शैक्षणिक वर्षात ५० प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ई वाचनालये सुरु करण्यात येणार आहेत.

कोविड लस देण्याचे निर्देश

वय वर्षे १५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोविड लस देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असून त्यानुसार महापालिकेच्या शाळांमध्ये ३ जानेवारी २०२२ पासून ३७ हजार ९६३ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असल्याचेही कुंभार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय निवेदनामध्ये म्हटले आहे.

शिक्षण अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

  • चित्रकला स्पर्धेसाठी ५० लाखांची तरतूद
  • संगीत अकादमीसाठी १४ लाखांची तरतूद
  • व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरसाठी सुमारे ३८ कोटी रुपये
  • विशालशील प्रयोगशाळा २९ लाख रुपये
  • ई वाचनालये १० लाखांची तरतूद
  • डिजिटल क्लासरुम सुमारे २७ कोटींची तरतूद
  • स्काऊट अँड गाईड ६० लाखांची तरतूद
  • शालेय इमारतींची दुरुस्ती व पुनर्बांधणी ४११.२० कोटींची तरतूद
  • शाळांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी ५.०१ कोटी रुपये
  • संगणक प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी ११.२० कोटींची तरतूद
  • शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणांसाठी ५७ लाखांची तरतूद
  • हाऊस किपिंगसाठी ७५ कोटींची तरतूद
  • टॅबचा पुरवठा करण्यासाठी ७ कोटींची तरतूद
  • शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी १०० कोटींची तरतूद
  • जलशुध्दीकरणाच्या देखभालीसाठी १ कोटींची तरतूद
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांकरता २.३७ कोटींची तरतूद
  • पॉलिमर डेस्कसाठी सव्वा तीन कोटींची तरतूद
  • खासगी प्राथमिक शाळांना अनुदानाकरता सुमारे ४१४ कोटींची तरतूद
  • ग्रंथ संग्रहालयांना अनुदान १ कोटींची तरतूद
  • बालवाडी वर्गांसाठी ९.०५ कोटींची तरतूद
  • कौशल्य विकास प्रयोगशाळांसाठी १.४० कोटींची तरतूद
  • शालेय इमारतींमध्ये अग्निशमन साहित्य व उपकरणांच्या खरेदीकरता २.६४ कोटींची तरतूद
  • शाळांमधील भिंतींवर चित्रे रंगवणे ५० लाखांची तरतूद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.