राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील वाद काही लपून राहिलेला नाही. एवढेच नाही तर विरोधी पक्षाच्या राजभवनावरील फेऱ्या देखील चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आता सध्या चर्चेत असलेले नाना पटोले राज्यपालांच्या दरबारी जाणार आहेत. तेही मोदी सरकारच्या विरोधात.
म्हणून नाना राज्यपालांना भेटणार!
मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून उद्या गुरुवार, १५ जुलै रोजी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
(हेही वाचा : डीएनए चाचणीविना रखडलेल्या दत्तक विधानांचा मार्ग मोकळा)
काय म्हणाले नाना?
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवनपर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा, यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.
Join Our WhatsApp Community