आता रेमडेसिवीरवरून केंद्र-राज्यात जुंपली! 

कोरोना प्रतिबंधात्मक लसीवरून राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्यारोप होत होते, आता रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ‘केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातदार १६ कंपन्यांना महाराष्ट्राला इंजेक्शन देऊ नका अन्यथा परवाना रद्द करू’, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला असतानाच दुसरीकडे केंद्रीय बंदर, जहाज, पाणी आणि रसायन खात्याचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ‘हा आरोप चुकीचा आहे. मलिक यांनी त्या १६ कंपन्यांची यादी द्यावी, त्यांच्याकडील साठा महाराष्ट्राला उपलब्ध करून देऊ’, असे म्हटले आहे. याआधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीवरून राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्यारोप होत होते, आता रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

काय म्हणाले नवाब मलिक? 

 • महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिली आहे.
 • केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत.
 • राज्यसरकारने 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे.
 • जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली आहे.
 • कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 • त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या 16 निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

काय म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय?

 • नवाब मलिक यांचा आरोप खोटा आणि अर्धसत्य आहे. मलिक हे वस्तुस्थितीपासून अनभिद्न्य आहेत.
 • भारत सरकारचे महाराष्ट्र सरकारातील अधिकाऱ्यांशी रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत कायम संपर्कात आहेत.
 • आम्ही रेमडेसिवीरचे दुप्पट उत्पादन करणाऱ्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी १२ एप्रिल रोजीच २० प्लांटला परवानगी दिली आहे.
 • महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. आम्ही रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांच्या संपर्कात आहोत.
 • नवाब मलिक यांनी त्या १६ कंपन्यांची नावे द्यावीत, ज्यांच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, केंद्र सरकार त्यांच्याकडील साठा ताब्यात घेऊन तात्काळ तो महाराष्ट्र सरकारला देईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here