मलिकांच्या तोंडीही आता ‘नानां’ची भाषा!

काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही तिथे कॉंग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील, असे नवाब मलिक म्हणाले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असे वारंवार वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचे आपण पाहिले असेलच. मात्र नाना पटोलेंच्या पावलावर राष्ट्रवादी देखील पाऊल टाकताना पहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नसल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. तिथले स्थानिक लोक जे निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

‘या’ ठिकाणी कॉंग्रेस – राष्ट्रवादी समोरासमोर लढतील!

स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही अशी पक्षाची स्पष्ट भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही तिथे कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी – शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : सह्याद्री अतिथीगृहावरील डागडुजीचा खर्च ठरतोय व्यर्थ!)

काँग्रेसचे आधीच ठरलेय!

आघाडी सरकारमध्ये एकत्र असूनही काँग्रेस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील पक्षाच्या भवितव्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ प्रस्तावित केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच दिली होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असूनही काँग्रेस स्थानिक निवडणुका एकट्यानेच लढवणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल हा निर्णय राहुल गांधी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here