शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ आमदारांनी बंड केल्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या आणि खोट्या शिवसैनिकांची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे यांच्या मुळमुळीत धोरणामुळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि उध्दव ठाकरे यांचे समर्थक असे दोन गट पडले असून त्यातूनच झालेल्या युवा सेनेच्या जन्मानंतर शाखाशाखांमधून जुन्या शिवसैनिकांसमोरच युवा सैनिकांचे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे फुटलेल्या शिवसेनेनंतर जुन्या शिवसैनिकांवर अवलंबून न राहता आता आदित्यच्या युवा सेनेवरच शिवसेनेची मदार राहणार आहे.
जुन्या शिवसैनिकांच्या बरोबरीने युवा सैनिकांची फौज तयार
शिवसेनेने भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करत युवा सेनेची स्थापना करत याचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले. त्यानंतर युवा सेनेचा विस्तार करत युवा सेनेची कार्यकारणी, युवा अधिकारी, युवा शाखा अधिकारी, युवती अधिकारी, युवती शाखा अधिकारी आदींची नेमणूक करून मुंबईसह राज्यातील विविध जिल्हा, तालुक्यासह गावागावांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून युवा सेनेचा विस्तार केला. प्रत्येक शाखांमध्ये शाखाप्रमुखांच्या बरोबरीने युवा शाखाअधिकारी यांना बसवण्यात आले आणि महिला शाखा संघटकांसोबत युवती शाखा संघटकांची नेमणूक करुन शिवसेनेच्या समांतर पातळीवर युवा सैनिकांची टिम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कामांमध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि युवा सैनिकांना विशेष महत्व देण्यात आले. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांच्या बरोबरीने युवा सैनिकांची फौज तयार करण्यात आल्याने शाखाशाखांमधून धुसफूस पहायला मिळत होती.
(हेही वाचा नरहरी झिरवळ यांनी फेटाळला स्वत:वरील अविश्वासाचा प्रस्ताव)
युवा सेनेवर शिवसेनेची मदार
परंतु एकनाथ शिंदे यांनी ४० ते ४५ आमदारांना फोडून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर आता उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे जुन्या शिवसैनिकांवरील विश्वास उडाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक असल्याने भविष्यात आपला समर्थक शिवसैनिक तयार करण्यासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आली होती. आज शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याच युवा सेनेवर शिवसेनेची मदार असून युवा सैनिकांच्या मदतीने शिवसेनेची पुढील वाटचाल केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्या दृष्टीकोनातून युवा सेनेची स्थापना केली होती, त्याच आदित्य ठाकरेंची सेनेच्या मदतीने शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार असल्याचा विश्वास उध्दव व आदित्य ठाकरे यांना असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात शाखांमधील महत्वाच्या पदांवर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वर्णी लावल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना घेऊन पुढे घेऊन जाण्याऐवजी आदित्यच्या युवा सेनेच्या सैनिकांना सोबत घेऊन शिवसेनेची पुढील वाटचाल करण्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि युवा सेनेचे अध्यक्षांचा भर राहणार असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community