मंत्रालयात (Mantralay) जाळ्यांवर उड्या मारणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी प्रकारच्या आंदोलनांचे प्रमाण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गृहविभागाने आता त्यावर कठोर प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मंत्रालय प्रवेशाचे नियम आता अधिक कठोर करण्यात येणार आहेत. अभ्यागतांना आता त्यांना ज्या विभागात जायचे आहे, केवळ त्याच मजल्यावर प्रवेश देण्यात येणार आहे. लवकरच प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशपास प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वाहनांना देखील अतिशय काटेकोरपणे प्रवेश देण्यात येणार आहे. उड्या मारण्याचे प्रकार रोखण्यासाठी मजल्यांवर अदृश्य स्टील बॅरियर रोप बसविण्यात येणार आहेत. तसेच १० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम घेउन मंत्रालयात प्रवेश करण्यासही बंदी करण्यात येणार आहे. राज्याच्या ग़हविभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे.
मंत्रालयात (Mantralay) अनेक आंदोलने होत असतात. उड्या मारणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. तसेच मंत्रालयात येणा-या लोकांच्या संख्येतही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. सरासरी तीन ते साडेतीन हजार अभ्यागत रोज मंत्रालयात येत असतात. कॅबिनेटच्या दिवशी तर रेकॉर्डब्रेक पाच साडेपाच हजारांपेक्षा जास्तीची गर्दी मंत्रालयात होत असते. मध्यवर्ती प्रांगणातील त्रिमुर्ती शिल्पाजवळ तसेच गार्डनमध्ये सेल्फी काढत बसण्याचे प्रकारही सध्या वाढले आहेत. मंत्रालय सुरक्षेसाठी असणा-या पोलीस यंत्रणेवर यामुळे मोठा ताण पडत असतो. त्यासाठी आता ग़ृहविभागाने मार्गदर्शक नियमावली सुचवली आहे. त्यातील काही नियम तात्काळ अंमलात येत असून काही नियम येत्या काही दिवसांत अंमलात येणार आहेत.
मंत्रालय (Mantralay) सुरक्षा टप्पा दोन जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा वेबपोर्टल व मोबाईल ॲपद्वारे अभ्यागतांची नोंदणी होणार आहे. अभ्यागतांना कलर कोड प्रवेश पास देण्यात येतील. त्यांना फक्त ज्या विभागात जायचे आहे त्या मजल्यावरच प्रवेश देण्यात येईल. इतर कुठेही जायची अनुमती त्यांना नसेल. प्रवेश पास ऑनलाईन देण्यात येणार आहेत. मंत्रालयात प्रवेश करणा-या वाहनांना आरएफआयडी टॅग लावण्यात येणार आहेत. रात्री उशीरापर्यंत अभ्यागतांना थांबू देण्यात येणार नाही. संध्याकाळी सव्वा सहा नंतर पोलीस संपूर्ण मंत्रालय चेक करून अभ्यागत थांबले असल्यास त्यांना बाहेर काढतील. बाहेरील खाद्यपदार्थांवर देखील मंत्रालयात आणण्यास बंदी घालण्यात येणार आहे. अपवाद फक्त कर्मचारी जे जेवणाचे डबे आणतात त्यांचा असेल. मंत्रालयात गच्चीवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येतील. उड्या मारणे रोखण्यासाठी मजल्यांवर अदृश्य स्टील रोपस लावण्यात येणार आहेत.
दहा हजारापेक्षा जास्तीच्या रोख रकमेवर बंदी
मंत्रालयात (Mantralay) रोख दहा हजारापेक्षा जास्त रक्कम घेउन येण्यासही बंदी घालण्यात येणार आहे. तसेच मंत्रालयाच्या आवारात असणा-या भटक्या कुत्री मांजरांवरही आता संक्रांत येणार आहे. मुंबई महापालिकेला या भटक्या प्राण्यांचा प्रतिबंध करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
ड्रोन यंत्रणाही सुरू होणार
मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ड्रोन यंत्रणा देण्यात आली आहे. मात्र सध्या ती नादुरूस्त अवस्थेत आहे. ती देखील पुनरूज्जीवित करण्यात येणार आहे. मंत्रालय सुरक्षेसाठी ड्रोन उडविण्यात येतील. तसेच मंत्रालयाच्या बाजूलाच लागून दोन पेट्रोलपंप आहेत. मंत्रालय सुरक्षेच्या द़ष्टीने त्यांचेही फायर ऑडिट करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community