एकनाथ खडसे यांनी एक छान वाक्य उच्चारलं, “वडिलांनी कमावलं आणि मुलांनी गमावलं” आणि हे खरंही आहे. प्रबोधनकार यांनी एक सामाजिक चळवळ चालवली होती, तो वारसा पुढे चालवत बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं एक राजकीय साम्राज्य निर्माण केलं. शिवसेना उभी करण्यात बाळासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या हाताने ते सर्व गमावलं.
( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर बॉक्सिंग क्लबचे सुयश )
उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली आणि हळूहळू शिवसेनेतून एकेक नेते बाहेर पडू लागले. जे होते त्यांना उद्धव ठाकरेंनीच नमवलं आणि जनतेशी थेट संबंध नसलेल्या लोकांना नेतेपद दिलं. ठाकरे नेहमी म्हणतात की मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. परंतु भाऊ तोरसेकरांनी एका व्हिडिओमध्ये खूप छान उदाहरण दिलं. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे स्वतःला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणवतात. पण बाळासाहेबांनी स्वतःला साहेब कधीच म्हटलं नाही. आपलं नाव लिहिताना ते बाळ केशव ठाकरे असं लिहायचे आणि स्वाक्षरी करताना बाळ ठाकरे अशी स्वाक्षरी करायचे.
म्हणून भाऊ तोरसेकर असं म्हणतात की उद्धव ठाकरेंना आपल्या वडिलांना ओळखता आलेलं नाही. जर त्यांनी आपल्या वडिलांना ओळखलं असतं तर उद्धव बाळ ठाकरे असं नाव लावलं असतं. आता निवडणूक आयोगाने त्यांना जे नाव दिलं आहे, ते त्यांना धर्मसंकटात टाकणारं आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याचा विचार केला आहे की, नाही याचा मला अंदाज नाही. कारण ठाकरेनी जे काही पर्याय निवडणूक आयोगाला दिले होते, त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा एक पर्याय होता आणि आयोगाने हेच नाव ठाकरेंना दिलं आहे. माझ्या मते हे नाव मिळाल्यामुळे ठाकरे खूश झाले असतील. कारण त्यांना त्यांच्या तारुण्यापासून बाळासाहेब व्हायचे होते.
आता शिंदे गटाला बाळासाहेब शिवसेना असं नाव मिळालंय. म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही शिंदे गटाची आणि दुसरी शिवसेना ही उद्धव गटाची. आता होणारी लढत ही बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी असणार आहे. मग आता ठाकरे प्रचाराच्या वेळी काय बोलणार? जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिकांनो आपल्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पराभव करायचा आहे?
खरं तर उद्धव ठाकरे चेक मेट झालेले आहेत. पण सोंगट्या आणि पट त्यांचा आहे असं त्यांना वाटतंय म्हणून त्यांनी हा पराभव अद्याप स्वीकारलेला नाही. पालिकेच्या निवडणूकीनंतर उद्धव ठाकरे यांचे अश्रूच त्यांना सांगतील की त्यांनी काय गमावलं आहे ते…
Join Our WhatsApp Community