शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नाही. महाराष्ट्र विधिमंडळात शिवसेनेला गळती लागल्यावर आता दिल्लीतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेतील १८ पैकी १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळातील कार्यालयाला कुलूप लावले
एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक हादरा देण्याची तयारी केलेली आहे. संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात शिंदे गटातील खासदारांनी कार्यालयाचा ताबा देण्याचीही मागणी केली आहे. आमच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत असल्याचे सांगत गटनेते पदावरही शिंदे गटाने दावा केला आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले, तेव्हाही अशाच चर्चा झाल्या होत्या. दोन दिवसांच्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या विधिमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते.
(हेही वाचा नुपूर शर्मांना मारण्याचा कट बीएसएफने उधळला, पाकिस्तानातून आलेल्या घुसखोराला अटक)
12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी
शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. लोकसभा सचिवालयाने मात्र या पत्रात काही बदल सुचवले. मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या असे शिंदे गटाला लोकसभा सचिवालयाकडून सांगण्यात आलं.
Join Our WhatsApp Community