एकेकाळी दादर परिसरात मराठी फेरीवाल्यांची चलती होती. दादरमध्ये मराठी फेरीवाल्यांशिवाय कुणीही दिसत नसत. दादर रेल्वे स्थानकासमोरील चार गल्ल्यांपासून ते एन.सी. केळकर मार्गापर्यंत मराठीच फेरीवाला असायचा, पण आता दादरमधील फेरीवाल्यांमधील मराठी टक्का घसरला आहे. आज केवळ २० ते २५ टक्केच मराठी फेरीवाला शिल्लक राहिलेला असून सर्व व्यवसाय आता परप्रांतियांच्या हातात गेला आहे. त्यातच भाडेकरु फेरीवाल्यांमुळे परप्रांतियांची संख्या अधिक वाढलेली असून मराठी माणसांनी आपल्या एकतर जागा विकून अथवा भाड्याने देत त्यावर परप्रांतियांच्या खुंट्या मजबूत करून टाकल्या आहेत.
मराठी फेरीवाल्यांचा टक्का २० ते २५ टक्क्यांवर
दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला पूर्वी सेनापती बापट मार्ग, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग, न्यायमूर्ती रानडे मार्ग, छबिलदास मार्ग आणि एन.सी. केळकर मार्गावर पूर्वी मराठी फेरीवाल्यांशिवाय अन्य कुणाची धंदा लावण्याची हिंमत व्हायची नाही. खांडके बिल्डींगसह आसपासच्या इमारतींमधील रहिवाशीच या ठिकाणी फेरीचा व्यवसाय करताना दिसत असत. बाहेरील व्यक्ती किंवा परप्रांतीय जर कुणी आला, तर त्याला तिथे व्यवसाय करण्यास परवानगी नसे किंबहुना तशी हिंमत कुठलाही परप्रांतीय फेरीवाला करत नसे. परंतु ज्या दादरमध्ये पूर्वी १०० टक्के मराठी फेरीवाले होते, त्याच दादरमध्ये आता मराठी फेरीवाल्यांच्या टक्का घटत चालला असून ही आकडेवारी २० ते २५ टक्क्यांवर पोहचली आहे. ज्या दादरमध्ये बाहेरील व्यक्तीला धंदा लावण्यास परवानगी नसायची, त्याच दादरमध्ये आज मुंब्रा, दिवा, कल्याण, विरार, नालासोपारा, वांद्रे, मानखुर्द, गोवंडी आदी भागांमधून परप्रांतीय येत व्यवसाय करत आहेत. त्यामुळे दादरमध्ये परप्रांतियांचा आकडा वाढत चालला असून मराठी फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
मी २००० मध्ये या विभागाचा पोलिस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यावेळी या दादरमध्ये १५ टक्के परप्रांतीय आणि ८५ टक्के मराठी फेरीवाले होते. पण आज त्याच्या उलट स्थिती असली तरी आजच्या घडीला मी समजतो, या दादरमध्ये केवळ १० टक्के मराठी फेरीवाले उरले आहेत. मुळात मराठी माणसाचा आळस हाच प्रमुख शत्रू आहे. त्यांना कमाई न करता पैसे मिळत असल्याने ते जागा भाड्याने देत आहे. इथेच खरे तर परप्रांतियांना पायघड्या घालण्यात आल्या. परप्रांतीय हे ग्रुपने राहत असतात. त्यांना घरदार नसते. त्यामुळे जिथे धंदा असेल तिथेच ते २४ तास राहतात. त्या तुलनेत मराठी फेरीवाले कुटुंब प्रपंचामुळे वेळेवर येतात आणि वेळेवर जातात. तर मराठी फेरीवाल्यांची पहिली पिढी आता राहिलेली नाही. त्यामुळे दुसरी पिढी ही सुशिक्षित आहे. त्यांना हा व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे त्यांनी जागा एक तर भाड्याने दिल्या नाहीतर विकून टाकल्या आहेत. त्यामुळे मराठी फेरीवाल्यांची संख्या कमी दिसून येत आहे.
– विश्वास काश्यप, निवृत्त पोलिस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते
राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
स्टार मॉल परिसरात पूर्वी एकही फेरीवाला नव्हता, पण आता तिथे २५ ते ३० फेरीवाले असून त्यांच्याकडे पुरावेही आहेत. यातील मराठी फेरीवाल्यांच्या संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. सेनापती बापट मार्गावर पूर्वी भाजीपाला इतर माल घेवून येणारे ट्रक रिकामे झाले कि ते निघून जायचे. परंतु आता या ट्रकला उभे करण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. एकेका ट्रककडून ३०० ते ४०० रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे दररोज १००हून अधिक टेम्पो, ट्रक येत असतात. ते सर्व ट्रक, टेम्पोमालक हे मराठी असून आपल्या शेतातील माल घेवून खरेदी करून ते विकायला आणत असतात. पण त्यांनाच आता मराठी माणसांचा गड समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये वाहने उभी करण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, मराठीचा कैवार घेणाऱ्या शिवसेना आणि मनसे तसेच भाजपचे या मुद्दयाकडे लक्ष दिसून येत नाही. त्यामुळे मराठी माणूस हा केवळ राजकीय पोळी भाजण्याइतपतच शिल्लक राहिला असून तो आपल्या न्याय्य हक्कांपासून आजही वंचित असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी फेरीवाल्यांमध्ये खांडके बिल्डींग, छप्रा बिल्डींगचे प्रस्थ असायचे. पण आज या इमारतीतील एकही फेरीवाला शिल्लक राहिलेला नसून मराठी माणूसही आता केवळ औषधापुरताच शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा : वाहनतळांची कंत्राटे महिला बचत गटांना, पण चालवतो कोण?)
अंदाजित फेरीवाले आणि कंसात मराठी फेरीवाल्यांची संख्या
- न्यायमूर्ती रानडे मार्ग : १९० ( ४०)
- जावळे मार्ग : १२५ भाडोत्री फेरीवाले (१५-२०)
- डिसिल्व्हा रोड: १३० ते १५० भाडोत्री (१५-२०)
- छबिलदास गल्ली : ८० (४)
- स्टेशन लगत : १०० सगळे (१०-१२)
- सुविधा ते विजय नगर : १५० भाडोत्री (१०-१२)
- जावळे रोड समोरची पदपथ : २०-२५ (५)
- रानडे रोड सिग्नल ते सर्वोदय : ६० (१०)
- एनसी केळकर रोड दादर इम्पोरियम ते विसावा हॉटेल : ४० ( ७-८)
- केळकर रोड सावरकर चौक ते सेना भवन : १५० (१०)
- केशव सुत पुलाखाली १२ बोगदे : प्रत्येक बोगद्यात २८ ते ३० : एकही मराठी नाही