नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर भाजपच्या पक्ष नेतृत्वाने कारवाई करत त्यांना प्रवक्तेपदावरुन निलंबित केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील नुपूर शर्मा यांच्या विरोधात निकाल दिल्यामुळे शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असतानाच आता 15 निवृत्त न्यायाधीश आणि अधिका-यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयचे सरन्यायाधीश एन व्ही रामण यांना एक पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांच्या विरोधात दिलेल्या निकालाचा या पत्रात निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे आता नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ निवृत्त न्यायाधीश आणि अधिका-यांची फौज उभी ठाकली आहे.
सरन्यायाधीशांना पत्र
या पत्रात माजी न्यायाधीशांनी न्यायालयाने आपली लक्ष्मण रेखा ओलांडली असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या निकालात तातडीने सुधारणा करण्याचेही सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत निवृत्त होईपर्यंत त्यांचे रोस्टर मागे घेण्यात यावे. तसेच या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी दिलेले आदेश मागे घेण्यात यावेत, अशा सूचनाही या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
यांनी पाठवले पत्र
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दिलेल्या या पत्रात एकूण 15 निवृत्त न्यायाधीश, 77 निवृत्त नोकरशहा आणि 25 निवृत्त लष्करी अधिका-यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. नुपूर शर्मा प्रकरणाची सुनावणी करणा-या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्याविरोधात हे पत्र सरन्यायाधीश रमणा यांना देण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
या प्रकरणी 1 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना खडसावले होते. शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे देशात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांनी तातडीने देशाची माफी मागावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले होते.
Join Our WhatsApp Community