भविष्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटणार?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्याने आधीच मराठा समाज आक्रमक असताना, आता ओबीसी समाज देखील आक्रमक होऊ लागला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे.

काय आहे पत्रात?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी 19 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.

(हेही वाचाः औरंगाबादमधील मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार!)

धनगर समाजही आक्रमक

एकीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज आक्रमक असताना, धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी येत्या 31 मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. पडळकर यांनी पारंपारिक वेशात आवाहन करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवही केला. 31 मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागे करावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहे.

(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता उतरणार रस्त्यावर!)

मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे रस्त्यावर

मराठा आरक्षणासाठी भाजप खासदार संभाजी राजे देखील चांगलेच आक्रमक झाले असून, माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेक जण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला, की मागे घेणार नाही. त्यावेळी मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. राज्यात भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका घ्यावी. मी काही भाजपचा ठेका घेतलेला नाही. त्यांनी मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, त्यावर मार्ग काढावा. आंदोलन काय असते, हे कोणीही मला शिकवू नये. आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात. आंदोलनाला काय लागते, आता लगेच करू. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहूंचा वंशज? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी आता ‘छत्रपतींचे’ मुख्यमंत्र्यांना पत्र!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here