ओबीसी आरक्षण : १३ महानगरपालिकांसाठी नव्याने सोडत काढणार

105

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील १३ महानगरपालिकांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शुक्रवार २९ जुलै रोजी मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत काढली जाणार आहे. तर, ५ ऑगस्टला अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाईल.

( हेही वाचा : मुंबईत येत्या शुक्रवारी एससी, एसटी वगळता ओबीसी, सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत)

१३ महानगरपालिकांसाठी नव्याने सोडत काढणार

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यालयाने २० जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशाला अनुसरून महापालिकांची सदस्य संख्या, प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबतचे २८ डिसेंबर २०२१ चे आदेश सुधारित केले आहेत. आता मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही, या मर्यादेत मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) यांच्या आरक्षणात कोणतेही बदल होणार नाहीत. मात्र, सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत रद्द करून मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढली जाणार आहे.

५ ऑगस्टला अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाणार

नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या १३ महानगरपालिकांचा त्यात समावेश आहे. निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार, २६ जुलैला आरक्षणासंदर्भात सूचना प्रसिद्ध केली जाईल. तर शुक्रवारी २९ जुलैला सोडत काढली जाणार आहे. ३० जुलैला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. ३० जुलै ते २ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सूचना आणि हरकती दाखल करता येतील. ५ ऑगस्टला अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.