प्रवीण दरेकरांची घसरली जीभ! काय दिला राष्ट्रवादीने इशारा? 

गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.

110

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यात सभेमध्ये बोलताना, ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असे वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरेकर यांनी माफी मागितली नाही तर त्यांचे थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा एनसीपीच्या महिला आघाडीने दिला आहे.

शिरूर इथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त ‘जय मल्हार क्रांती संघटने’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते. यावेळी बोलतानाच त्यांनी हे वक्तव्य केले. ‘राष्ट्रवादी हा सुभेदारांचा, कारखानदारांचा, बँकेवाल्यांचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राष्ट्रवादीतील नेतृत्वाकडे बघा…या पक्षात कुठल्या गरीब माणसाला आमदार, खासदार होता आले नाही. भाजपच्या आमदारांची आणि खासदारांची यादी बघा..आमच्या पक्षात संघर्ष करणाऱ्यांना स्थान आहे,’ असेही ते म्हणाले.

(हेही वाचा : परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा! मुख्यमंत्र्यांचा आदेश)

दरेकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रविण दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ‘प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही दरेकर यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.