ठाकरे सरकारला अधिकारी किंमत देईनात!

याआधी सचिन वाझे, अमिताभ गुप्ता, परबवीर सिंह यांच्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. आता मुख्य सचिव सीताराम कुंटे, संजय पांडेंमुळे सरकारला त्रास झाला आहे.

116

ठाकरे सरकार आणि अधिकारी यांच्यातील तू-तू, मै-मै या ना त्या कारणामुळे नेहमीच समोर आली आहे. कधी परमबीर सिंग तर कधी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावरून ठाकरे सरकारमध्ये नाराजी पहायला मिळाली. त्यातच आता पोलिस महासंचालक संजय पांडे हे अचानक सुट्टीवर गेल्याने आता अधिकारीच ठाकरे सरकारला किंमत देत नाहीत का? असा सवाल मात्र या निमिताने उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे हे चंदीगडला सुट्टीवर गेल्याने शिवसेना नाराज झाली असून, संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. राज्यात वादळाचे संकट असताना संजय पांडे सुट्टीवर गेल्याने शिवसेना नाराज झाली असून, आता संजय पांडे यांच्याविरोधात शिवसेनेने दंड थोपटले आहेत.

म्हणून शिवसेना नाराज आहे का?

पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंग यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार संजय पांडे यांच्यावर नाराज आहे. त्यातच आता  संजय पांडे हे अचानक सुट्टीवर गेल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. याचमुळे आता संजय पांडे यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

(हेही वाचा : राज्याचे पोलिस महासंचालक अचानक गेले रजेवर… काय आहे नेमके कारण?)

संजय पांडे यांनी याआधीही व्यक्त केली नाराजी

दरम्यान याआधीही बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली होती. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही, असेही त्यांनी याआधी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. माझ्याहून एक वर्ष आणि दोन वर्ष ज्युनिअर असलेल्या अधिकाऱ्यांना मोठी पदे दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्ही कार्यवाहक पोलिस महासंचालक बनवू शकत नाही. यूपीएससीला माझी फाईलच पाठवली नाही, हे सर्वच मी त्या पत्रात लिहिले आहे. तसेच आता मी राज्य सरकारविरोधात कोर्टात जाणार असल्याचेही ते म्हणाले होते.

याआधी या अधिकाऱ्यांनीही वाढवली डोकेदुखी!

याआधी सचिन वाझे, अमिताभ गुप्ता, परबवीर सिंह यांच्यामुळे सरकारची डोकेदुखी झाली होती. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर त्यामागे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे असल्याचा आरोप, थेट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. हे प्रकरण इतके गाजले की यामुळे ठाकरे सरकारची पुरती बदनामी झाली. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांच्यामुळे गृहमंत्र्यांनाच पायउतार व्हावे लागले.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.