आता पेगॅसेस प्रकरणी फडणवीस सरकारच्या काळातील अधिका-यांची चौकशी होणार

या अधिकाऱ्यांना का आणि कशासाठी इस्त्रायलला पाठवले होते? कोणी पाठवले होते?

67

देशात पेगॅसस प्रकरण गाजत असतानाच 2019 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात, इस्त्राईलच्या दौऱ्यावर गेलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. चौकशीमुळे प्रकरणातील धागेदोरे समोर येणार आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

काही अधिकारी रडारवर

राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पेगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारही पेगॅसिस प्रकरणावरुन अडचणीत आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्रातही या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याचा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप झाल्याचे म्हटले. संसदीय अधिवेशनातही महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा दावा करत विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी केली.

(हेही वाचाः यंदा मनसे निर्बंधांची हंडी फोडणार!)

फडणवीस अडचणीत येणार?

आता 2019 मध्ये फडणवीस सरकार काळात राज्य शासनातील काही अधिकारी, निवडणूक निकाल लागल्यानंतर इस्त्राईलला गेल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हा वाद चिघळला आहे. या अधिकाऱ्यांना का आणि कशासाठी इस्त्रायलला पाठवले होते? कोणी पाठवले होते? याची सविस्तर चौकशी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी प्रशासनाला दिल्याचे समजते. फडणवीस सरकार काळातील प्रकरण असल्याने फडणवीस देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोन टॅपिंग प्रकरण गंभीर

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन २०१७-१८ मध्ये टॅप झाला होता. आता हे प्रकरण देशपातळीवर समोर येत असून, ते गंभीर आहे. देशातील महत्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडे जाऊ शकते, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. महाराष्ट्रातही फोन टॅपिंगचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात उचलून धरला होता.

(हेही वाचाः आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करा! अशोक चव्हाणांची मागणी)

पाळत ठेवल्याचा आरोप चुकीचा

मुख्यमंत्री असताना कुणाचेही फोन टॅप केलेले नाहीत. महाराष्ट्रातून इस्राईलला गेलेल्या अधिकाऱ्यांचा दौरा पुर्वनियोजित होता. तेथील शेती आणि माध्यमे या विषयांचा अभ्यास करण्यासाठी ते गेले होते. निवडणूक निकालानंतर माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकारी गेले होते. त्यामुळे पाळत ठेवल्याचा आरोप चुकीचा असल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.