ओमिक्रॉन व्हेरिएंट : मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची मंत्रिमंडळाची सूचना 

96

सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतासह महाराष्ट्रातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबत पुन्हा निर्बंध लावण्याची गरज बनली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, अशी सूचना सोमवारी, २९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय नियमावली असावी, या संदर्भात केंद्रांचे काय धोरण आहे, हे समजून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

तब्बल तासभर ही बैठक होती. बैठकीत या नव्या व्हेरियंटबाबत माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी नव्या नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही ही सूचना मान्य केली असून ते लवकरच मोदींशी या विषयावर चर्चा करणार आहेत. परदेशी प्रवाशांसाठी नियमावली दुबईमध्ये 13 देशांमधून येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे. तशाच प्रकरे महाराष्ट्रामध्ये देखील नियमावली असावी याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही नियमावली तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा महाविकास आघाडी सरकारची २ वर्ष आणि १० संघर्ष! जाणून घ्या कोणते…)

शाळांचा निर्णय आरोग्य विभाग घेणार

दरम्यान, १ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली मात्र निर्णय घेण्यात आला नाही. त्यामध्ये याविषयावर आरोग्य विभाग अंतिम निर्णय घेईल, असे ठरवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आरोग्य विभागाने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. देशातील कोरोनाची परिस्थिती, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका आणि बदलते हवामान याचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच ओमिक्रॉनच्या धोक्याची चाहूल लागल्याने आता शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार होणार आहे.

12 देशातल्या प्रवाशांची विमानात बसण्यापूर्वी चाचणी

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे, असेही बैठकीत ठरले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.