सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. त्यामुळे उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शड्डू ठोकून तांबेंविरोधात मैदानात उतरली आहे. त्यांचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी भाजपा सत्यजित यांच्या पाठिशी उभी राहणार असून, त्यांना उघड पाठिंबा द्यायचा, की छुपा, याचा फैसला १६ जानेवारीला दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘काँग्रेसने साथ सोडली, तरी तुम्हाला जिंकून आणू’
सत्यजित तांबे कॉंग्रेसकडून पदवीधरसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांनी पदवीधरऐवजी विधानसभा निवडणूक लढवावी, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत होते. त्यामुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. परंतु, भाजपाने सत्यजित यांची राजकीय महत्त्वाकांक्षा हेरत योग्य फासे टाकले आणि डाव पालटला. त्यांनी सत्यजित यांना विश्वासात घेत अपक्ष अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला. कॉंग्रेसने साथ सोडली, तरी संपूर्ण भाजपा, शिंदे गट आणि ‘अदृश्य’ ताकद पाठिशी उभी करू करून तुम्हाला जिंकून आणू, असा विश्वास देण्यात आला.
विधानपरिषदेत बहुमतासाठी भाजपाला शिक्षक आणि पदवीधरच्या सर्व जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर टाकलेला डाव यशस्वी करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे. त्यासाठी राज्यातील कोअर टीम उत्तर महाराष्ट्रात कामाला लागली आहे. तांबेंना उघड पाठिंबा द्यायचा, की अन्य मार्गाने, याचा फैसला दिल्ली दरबारी होणार आहे. त्याआधी सत्यजित तांबे राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती करतील. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १६ जानेवारीला दिल्लीत जातील. ते दोन दिवस दिल्ली मुक्कामी राहणार आहेत. तेथे संसदीय समितीने परवानगी दिल्यानंतर ते सत्यजित तांबेंबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाणार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १६ आणि १७ जानेवारीला दिल्लीला जाणार आहेत. तेथे ते सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबत केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर भाजपाच्या संसदीय समितीची बैठक होईल. या समितीत जेपी नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियूरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, बीएल संतोष (सचिव) यांचा समावेश आहे. संसदीय समितीने परवानगी दिल्यानंतर बावनकुळे पाठिंब्याविषयी निर्णय जाहीर करतील.
(हेही वाचा – सत्यजित तांबेंवरून मविआत धुसफूस; संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप)
Join Our WhatsApp Community