मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? ‘या’ दिवशी होऊ शकतो विस्तार

150

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. पण अजूनही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. पण आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे समजत असून मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार?

9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राजभवनात शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर मंत्रिमंडळ विस्तारासाठीची सगळी गोळाबेरीज पूर्ण झआली असून सोमवारी रात्रीसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सोमवारी झालेल्या भेटीत याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

नव्या चेह-यांना संधी

त्यामुळे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गट,भाजप आणि सरकारचे समर्थक असलेल्या अपक्ष आमदारांना मंत्रिपदे देण्यात येतील अशीही माहिती मिळत आहे. यामध्ये नव्या चेह-यांना देखील संधी देण्याची शक्यता आहे.

अधिवेशनालाही मुहूर्त मिळाला

मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. विधी मंडळात सोमवारी अधिका-यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 3 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते, पण सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे अधिवेशनाची तारीखही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तारखेवर देखील शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.