मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबर हा अल्टिमेटम दिला होता. शनिवार, २३ डिसेंबर रोजी जरांगे पाटलांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली. त्यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) २० जानेवारी २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करणार आहे, अशी घोषणा केली.
या सभेला बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, २० जानेवारीपर्यंत कुणी आंदोलन करायचे नाही, कुणीही परस्पर बैठका घ्यायच्या नाही. त्या दरम्यान सरकार माझ्याशी बोलणी करायला येऊ शकते, पण २० जानेवारीनंतर चर्चा करणार नाही, थेट आरक्षण घेऊनच येणार, असेही जरांगे पाटील म्हणाले. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचे ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा. मराठा समाजाला ताटकळत ठेऊ नका. नाहीतर शांततेत तुमचा सुफडा साफ केला जाईल. तुमचे राजकीय अस्तित्व संपवले जाईल. तुम्ही ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला 100 टक्के जड जाणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
…म्हणून सरकारला माझा प्रॉब्लेम
मी सरकारला मॅनेज होत नाही हाच यांचा प्रॉब्लेम आहे. मी जिवंत असेपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देणारच. मराठा समाज आणि माझे नाते हे माय-लेकाचे आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पीढीला आरक्षण मिळवून देणार. या आधीच्या पीढीचे आयुष्य आरक्षणाविना उद्ध्वस्त झाले. आता मराठा जागा झाला आहे. सरकारने पुन्हा एकदा डाव रचला. मराठा समाजातील आंदोलकांना नोटिसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन सभेला गेला तर तो जप्त केला जाईल असे त्यात म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंदोलन करायचे पण शांततेत, ते ब्रह्मात्र आहे. शांततेत आंदोलन केल्यास ते थांबवायचे कुणाच्यात हिंमत नाही. पुन्हा अंतरावली सराटी करण्याची हिंमत सरकारने करू नये, तेव्हा आम्ही गप्प बसलो आता नाही, असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
Join Our WhatsApp Community