अखेर राज्यपाल देणार भेट! ‘तो’ तिढा सुटणार का?

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री राज्यपालांची भेट घेण्याच्या प्रयत्नात होते, मात्र राज्यपालांची वेळ मिळत नव्हती म्हणून चिंता वाढली होती.

173

अवघ्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकात दम आणणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अखेर भेट घेऊन काय तो समेट घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारमधील प्रमुख नेत्यांनी ठरवले आहे. त्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याच्या प्रयत्नात होते, मात्र राज्यपालांची वेळ मिळत नव्हती म्हणून चिंता वाढली होती. परंतु अखेर १ सप्टेंबर रोजी राज्यपालांनी भेटीसाठी वेळ दिली आहे, त्यामुळे आता तरी समेट घडणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

१२ आमदारांच्या यादीचा विषय सुटणार?

मंगळवारी होणारी ही भेट खास विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीसाठी घेण्यात येणार आहे. मागील आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे भावी आमदारांची यादी स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. त्यावर तात्काळ स्वाक्षरी करण्यात यावी, अशी विनंती या भेटीत करण्यात येणार आहे.

अखेर वाद पोहचला उच्च न्यायालयात!

दरम्यान राज्यपाल सहकार्य करत नाहीत, त्यामुळे अखेर याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पोहचला. परंतु न्यायालयाने यावर राज्यपालांच्या अधिकारांचा अभ्यास करून ‘राज्यपाल ज्या घटनात्मक पदावर बसले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही, परंतु त्यांनी त्या १२ सदस्यांच्या यादीविषयी तात्काळ निर्णय घ्यावा’, अशी सूचना केली.

मागील आठवड्यात भेट नाकारलेली!

मागील आठवड्यात २६ ऑगस्ट रोजी हे भेट होणार होती. मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण राज्यपाल चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेले होते. दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर ते उत्तराखंड इथे गेले होते. उत्तराखंडाचा दौरा करून आल्यानंतर राजभवनाकडून भेटीसाठी वेळ दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.