ईडीच्या फेऱ्यात अडकलेले परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. नक्की कुणाला साथ द्यावी, अशा पेचात अडकलेल्या परबांनी मात्र तटस्थ राहून ईडीच्या चौकशीला सामोरे जाणे योग्य अशी भूमिका घेत सलग तिसऱ्या दिवशी परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परब यांची ईडीच्या चौकशीतून मुक्तता होईल का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
सलग तीन दिवस परब ईडी चौकशीसाठी हजर
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सरकार अडचणीत आलेले असतांना शिवसेनेचे नेते आणि सरकारच्या पहिल्या फळीतील कॅबिनेट मंत्री अनिल परब मात्र ईडीच्या फेऱ्यात अडकलेले दिसत आहे. परब यांची दोन्ही बाजूनी कोंडी झाल्यामुळे नक्की कुणाला साथ द्यावी असा प्रश्न परब यांना पडलेला असताना त्यांनी अखेर तिसरा पर्याय निवडून तटस्थ राहण्याचा पर्याय निवडला आहे. ईडीने यापूर्वी अनेक वेळा समन्स पाठवूनही चौकशीला गैरहजर राहिलेले मंत्री अनिल परब यांनी कुठलीही कुरबुर न करता मंगळवारी ईडी कार्यालयात दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी दाखल असलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात हजर झाले होते. त्यानंतर सलग तीन दिवसांपासून परब हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहत आहेत.
(हेही वाचा – ‘मविआ’तून बाहेर पडायला ‘शिवसेना’ तयार, राऊतांंनी सांगितले…)
परबांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा
मंगळवारपासून राज्यात राजकीय घमासान सुरू असताना परब मात्र ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे जात होते, मंगळवारी त्यांची ११ तास चौकशी करण्यात आली व त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. बुधवारी पुन्हा त्यांना चौकशीला बोलविण्यात आले व परब हे दुपारी ३ वाजता ईडी कार्यालयात आले. ७ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना गुरुवारी दापोली येथील साई रिसोर्टच्या कागदपत्रांसह गुरुवारी पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून परबाच्या मागे लागलेला ईडीच्या चौकशीचा फेरा लवकरच कायमचा दूर होईल, अशीही चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.
Join Our WhatsApp Community