पुन्हा रंगला नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांचा सामना

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मागच्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची जंत्री सुरु केली आहे. मलिकांनी आर्यन खान याच्या ड्रग्स प्रकरणी झालेल्या अटकेनंतर वानखेडेंवर ट्विटरवरुन आणि पत्रकार परिषदेमधून अनेक आरोप केले. या आरोपांनंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आपला पक्ष मांडण्यास सुरुवात केली. क्रांती यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या, तसेच अनेक प्रसारमाध्यामांना मुलाखती देऊन मलिक करत असलेल्या आरोपांचे खंडन केले. क्रांती आधी उघडपणे नवाब मलिकांचे नाव घेणे टाळत होत्या, पण आता मात्र त्या सरळ नाव घेऊनच बोलू लागल्या आहेत. आता नुकताच मलिकांनी ट्विटरवरुन एक स्क्रिनशॅाट शेअर केला होता. त्यावरुन आता पुन्हा एकदा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? 

मागच्याच काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप केला होता. आता याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचे सांगितले. त्याच विषयावरील हे चॅट आहे.

मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचे सांगितले आहे. ‘क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,’ असे या युजरने म्हटले आहे. त्यावर रात्री क्रांती रेडकरने, ‘तुमच्याकडे काय पुरावे आहेत?’, असा रिप्लाय केला आहे. ‘माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,’ असे या युझरने म्हटले आहे. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, ‘कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,’ असा रिप्लाय केला आहे. या संवादाचा स्क्रीनशॉर्ट मलिक यांनी, ‘अरे देवा…’ अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

हा सारा प्रकार म्हणजे बनाव

मात्र या ट्विटनंतर काही तासांनी क्रांतीने ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. नवाब मलिक यांनी जो फोटो शेअर केला आहे तो एका सटायर म्हणजेच उपहासात्मक मिम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाऊंटवरील असून तो एडीटेड कंटेट असल्याचे या अकाऊंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनेच म्हटले आहे. क्रांतीने हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, ‘हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते,’ असे म्हटले आहे.

 ( हेही वाचा :दोन वर्षांनंतर सिद्धिविनायकाचे भाविकांना झाले दर्शन! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here