राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जी भीती वाटत होती, ती अखेर खरी ठरली असून ऑनलाईन महापालिका सभेऐवजी प्रत्यक्ष सभा आयोजित केल्यानंतर दुसऱ्याच सभेत शाब्दिक राडेबाजी सुरु होऊन दोन्ही पक्षांकडून धक्काबुक्कीचे आरोप होऊ लागले आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा आक्रमक होऊ न देता सभागृह चालवण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे सभा घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महापालिका सभा या प्रत्यक्ष ऐवजी ऑनलाईन घेण्याचे फतवा जारी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सभागृहात गोंधळ
मुंबई महापालिकेच्या सभा तब्बल २० महिन्यांनी प्रत्यक्ष सुरु झाल्या आहेत. परंतु पहिली सभा शोक प्रस्तावामध्ये गेल्यानंतर दुसऱ्या सभेमध्ये भाजपने गोंधळ घातल्यानंतरही त्यात महापौरांनी कामकाज उरकून घेतले होते. परंतु शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सभेमध्ये नायर रुग्णालयात रुग्णाच्या उपचारात डॉक्टर आणि नर्सनी केलेल्या हलगर्जीपणाचा निषेध म्हणून काढलेल्या हरकतीच्या मुद्यावर जोरदार चर्चा झाली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपच्या ज्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामे दिले, त्यांच्याबाबत जे विधान केले, त्यावर दोन्ही पक्षातील नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावर धाव घेतली.
(हेही वाचा आयजीच्या जिवावर बायजी उदार: महापौरांना स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी मिळाला वेळ, पण…)
त्यानंतर सभेचे कामकाज संपल्यानंतरही माध्यमांशी बोलतांना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलू न देता जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला. हा प्रकार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप करत भाजपने पोलिस सह आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने महापालिकेच्या प्रत्यक्ष सभा आता अडचणीच्या ठरत आहेत.
…तर रस्त्यावर महापालिका सभांच्या दिवशी राडा होईल
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या दोन महिन्यांवर आलेली असताना भाजप अधिक आक्रमक होऊन कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे त्यांना अधिक आक्रमक होऊ न देता पुन्हा प्रत्यक्ष सभा घेण्याचा जो काही निर्णय घेतला आहे, तो बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत. कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी महापालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहाऐवजी राणीबागेतील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात या सभा घेण्यात येत आहे. आजवर महापालिका मुख्यालयातील सभागृहात दोन्ही पक्ष एवढे आक्रमक होऊनही कधीही सत्ताधारी पक्षाने भाजपच्या सदस्यांना धक्काबुक्की केली नव्हती. परंतु राणीबागेतील सभागृहामध्ये सभा पार पडल्यानंतर आतील पडसाद बाहेरही उमटत असतील, तर नगरसेवकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोक्याचे आहे, अशी भावना भाजपच्याही नगरसेवकांमध्ये उमटली आहे. हा मतदार संघच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा असून त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या आमदार आहेत. त्यामुळे सभागृहात काही घडल्यास, सभागृहाच्याबाहेर शिवसैनिकांना बोलावून अशाप्रकारे धक्काबुक्की होण्याचीही भीती भाजपच्या नगरसेवकांना असून भविष्यात तसे झाल्यास भाजपचेही कार्यकर्ते आपल्या नगरसेवकांच्या सुरक्षेसाठी राणीबागेबाहेर जमा होण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास शिवसेनेचेही कार्यकर्ते येतील. त्यामुळे रस्त्यावर महापालिका सभांच्या दिवशी राडा होण्याची शक्यता लक्षात घेता पुन्हा एकदा ऑनलाईन सभेचेचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.