रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील महामुंबई सेझ आस्थापनासाठी संपादीत करण्यात आलेली जमीन शेतकर्यांना परत करण्याविषयी जिल्हाधिकार्यांकडे चालू असलेली सुनावणी ३ महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात केली. सदस्य सुनील राणे यांनी हा प्रश्न विचारला होता.
१ हजार ५०४ हेक्टर जमीनचा व्यवहार केला अपूर्ण
‘महामुंबई सेझ आस्थापनासाठी उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १ हजार ५०४ हेक्टर जमीन शासनाने संपादीत केली होती. प्रत्यक्ष प्रकल्प न झाल्याने ही जमीन शेतकर्यांना परत करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे; मात्र शासन ही जमीन परत करण्यास का विलंब करत आहे?, असा प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला. त्यावर उत्तर देतांना सुभाष देसाई म्हणाले की, याविषयी जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी चालू असून लवकरात लवकर ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे सांगताच त्यावर ही सुनावणी कधी पूर्ण होणार आहे?, असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारला. त्यावर देसाई यांनी ३ महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या चर्चेत सहभागी होताना आमदार महेश बालदी यांनी याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी, अशी मागणीही केली.
Join Our WhatsApp Community