ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री पाच सुपर मुख्यमंत्री! देवेंद्र फडणवीसांचा टोला

प्रत्येक मंत्री  आधी निर्णय जाहीर करतो, नंतर सांगतो 'ही घोषणा मुख्यमंत्री करतील'. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी श्रेय घ्यावे, अशी टीकाविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात अनलॉकच्या गोंधळावरून ठाकरे सरकारवर आता चहुबाजूने टीका होत असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री असल्याचा टोला त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला. जे मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे, त्यावर त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य येत नाही आणि त्याआधी पाच मंत्री बोलतात. राज्यात एक मुख्यमंत्री आणि पाच सुपर मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक मंत्री जाहीर करतो आणि नंतर ही घोषणा मुख्यमंत्री करतील, असे सांगतो. प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम करुन तरी ते श्रेय घ्यावे, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मंत्र्यांना शिस्त लावा!

मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. बोलण्यावर बंधने आणू नये, पण किमान मोठ्या धोरणात्मक निर्णयावर सरकारचे म्हणणे आहे ते स्पष्टपणे आणि थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गोंधळ इतका निर्माण झाला आहे की, लॉकडाउन आहे की नाही यासंदर्भात अनेकांचे फोन आले. आमच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते. लॉकडाउनमुळे सध्या लोकांमध्ये संभ्रम, उत्कंठा, निराशा आहे. त्यामुळे काल घोषणा झाल्यानंतर लोकांना वाटले झाले सुटलो. छोट्या दुकानदारांना निर्बंध संपले असे वाटले. अनेक दुकानदारांचा सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेला विरोध असून सकाळी ९ ते सायंकाळी ४ करावी, अशी मागणी आहे. त्यामुळे अनेकांची निराशा या माध्यमातून झाली. सरकारने या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा : ओबीसी आरक्षण पूर्णतः रद्द नाही! विजय वडेट्टीवार यांचा दावा )

मागासवर्गीय आयोगाची स्थापना हे उशिरा आलेले शहाणपण!

मागासवर्गीय आयोगाची स्थापना हे उशिरा आलेले शहाणपण आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचेच नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. कायदा करायचा अधिकार राज्याचाच आहे. राज्य सरकारला मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मंजूर करून तो केंद्राच्या मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला लागतो. तुम्ही लोकांना संमत करू शकत नसाल तर गोंधळ निर्माण करा…या तत्त्वावर हे सरकार चालते. वेळेवर आयोग स्थापन न झाल्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here