एक कट पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर दुसरा वाझेच्या कार्यालयात शिजला?

हे दोन्ही कट नेमके कशासाठी आणि कशाप्रकारे शिजले याचा तपास एनआयएकडून सध्या सुरू आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवायचा कट पंचतारांकित हॉटेल मध्ये शिजला होता. तर मनसुखच्या हत्येचा कट पोलिस मुख्यालयातील सीआययु कार्यालयात शिजल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला आला आहे. त्या अनुषंगाने एनआयए तपास करत आहे.

कोणी भरले १३ लाखांचे बिल?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी सचिन वाझे हा दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली घेऊन राहत होता. त्या ठिकाणी अनेक जण वाझेला भेटायला येत होते, तसेच एक महिला देखील वाझे सोबत असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. हॉटेलचे १३ लाखांचे बिल भरणारा झवेरी बाजारातील ज्वेलर्सने देखील एनआयएला सापडला आहे. एनआयएने या ज्वेलर्सचा जबाब नोंदवून घेतला आहे, त्याने आपल्या जबाबात धक्कादायक माहिती एनआयएला दिली असल्याचे समजते. सचिन वाझे याने या ज्वेलर्सला सीआययुच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्याचे एक काम करण्याच्या बदल्यात त्याला हॉटेलचे बिल भरण्यास सांगितले होते. ३ मार्च रोजी हा ज्वेलर्स सीआययुच्या कार्यलयात गेला त्यावेळी वाझे याच्या केबिनमध्ये दोघे जण बसले होते, त्यापैकी एक जण विनायक शिंदे तर दुसरे गुन्हे शाखेच्या एका युनिटचे प्रभारी होते, असे त्याने जबाबात सांगितल्याचे समजते.

(हेही वाचाः राज्यात ठाकरे सरकार कोसळणार?)

ते दोघे काय करत होते मुख्यालयात?

जन्मठेपेची शिक्षा झालेला बडतर्फ पोलिस शिपाई विनायक शिंदे आणि गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी हे दोघे मनसुख हिरेनच्या हत्येच्या आदल्या दिवशी मुंबई पोलिस मुख्यालयात असणाऱ्या सीआययुच्या कार्यालयात काय करत होते? मनसुखच्या हत्येचा कट सीआययु कार्यालयातच शिजला होता का? असा संशय एनआयएला असून त्या अनुषंगाने तपास केला जात असल्याचे समजते.

…म्हणून हिरेनची हत्या?

मुकेश अंबानीच्या घराजवळ सापडलेल्या गाडीच्या गुन्ह्याचा तपास सर्वात अगोदर सीआययु युनिट करत होते. या गुन्ह्याचा तपास अधिकारी स्वतः सचिन वाझे होता. वाझे तपास करत होता तो पर्यंत ठीक होते, मात्र तपास त्याच्याकडून काढून एसीपी नितीन अलुकनुरे यांच्याकडे देण्यात आल्यानंतर आपले पितळ उघडे पडेल या भीतीने वाझेने मनसुख हिरेन याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ३ मार्चच्या मीटिंग नंतर ४ मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन याला तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने मनसुखला ठाण्यातील घोडबंदर रोड येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर ५ मार्च रोजी मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी येथे सापडला होता. मनसुख याच्या हत्येप्रकरणी लखन भैया कथित चकमक प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा पोलिस शिपाई विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना एटीएसने अटक केली होती. विनायक शिंदे हा कोरोनाच्या कारणाने मे महिन्यात पॅरोलवर बाहेर आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here