मुंबईत दरदिवशी एक लाख लसीकरण करण्याची महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलेली घोषणा आता प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पार पडले. एक लक्ष लसीकरणाची हॅट्रीक झाल्याने मुंबईतील एक लाख लसीकरणाचे स्वप्न पूर्णत्वास आल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत सुरुवातीच्या काळात लसीकरणाची मोहीम अत्यंत धिम्या गतीने सुरु असली तरी आजवर दिवसाला ५० हजारांचे लक्ष्य ठेवणाऱ्या मुंबईत आता एक लाख लसीकरण करण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून दर दिवशी एक लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण पार पडत आहे. बुधवारी, २३ जून रोजी १ लाख ११ हजार ११० लोकांचे लसीकरण पार पडले. सर्वप्रथमच २१ जून रोजी मुंबईत १ लाख ०८ हजार १४८ लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी २२ जून रोजी १ लाख १३ हजार १३५ लोकांचे लसीकरण पार पडले.
(हेही वाचा : हाफिस सईदच्या घराशेजारी बॉम्बस्फोट! पाकिस्तानची नवी रणनीती! )
आतापर्यंत सर्वाधिक ९६ हजार ८६० जणांचे लसीकरण झाले!
आतापर्यंत मुंबईत ८ जून रोजी सर्वाधिक म्हणजे ९६ हजार ८६० जणांचे लसीकरण झाले होते. परंतु सर्वाधिक लसीकरण झाल्यानंतर पुन्हा एकदा लसीकरणाचा आकडा कमी आला होता. परंतु मागील तीन दिवसांपासून एक लाखांहून अधिक लसीकरण पार पडले जात आहे. त्यामुळे सलग तीन दिवस एक लक्ष लसीकरण होत असल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. मुंबईत मागील तीन दिवसांमधील आकडेवारीचा विचार केल्यास १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे २१ जूनपासून अनुक्रमे ७५ हजार ३१६, ८० हजार ९३२ आणि ७९ हजार ७४८ एवढे लसीकरण झाले आहे. ही आकडेवारी पाहता १८ ते ४४ या वयोगटातील शुल्क आकारुन होणाऱ्या लसीकरणाचे प्रमाण ७५ ते ७७ टक्के एवढे असल्याचे दिसून येत आहे.
मागील तीन दिवसांमधील लसीकरण
२१ जून : एकूण लसीकरण – १, ०८, १४८ (१८ ते ४४ वयोगट : ७५,३१६)
२२ जून : एकूण लसीकरण – १,१३,१३५ (१८ ते ४४ वयोगट : ८०,९३२)
२३ जून : एकूण लसीकरण – १, ११, ११० (१८ ते ४४ वयोगट : ७९,७४८
Join Our WhatsApp Community